वाल्मीला बळकट करण्यासाठी जलसंधारण कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:06 AM2021-01-13T04:06:16+5:302021-01-13T04:06:16+5:30
औरंगाबाद : उपलब्ध जमीन, पाणी या घटकांचा सुनियोजित उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वाल्मी संस्थेला ...
औरंगाबाद : उपलब्ध जमीन, पाणी या घटकांचा सुनियोजित उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने वाल्मी संस्थेला अधिक बळकट करण्यासाठी कृती आराखडा जलसंधारण विभागातर्फे तयार केल्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सोमवारी सांगितले.
जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आमची माणसे या दोनदिवसीय बुद्धिमंथन कार्यशाळेचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, अपर मुख्य सचिव नंदकुमार, मनरेगा आयुक्त शंतनू गोयल, वाल्मीचे प्रभारी महासंचालक मधुकर आर्दड, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते. जलसंधारणमंत्री गडाख म्हणाले, राज्याच्या शाश्वत विकासासाठी उपलब्ध जमीन आणि पाणी यांचा सुयोग्य वापर आणि त्यासाठीचे प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. राज्याचा, कृषी क्षेत्राचा आणि पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास साध्य करू शकतो. या प्रशिक्षणामध्ये वाल्मी संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.
जमीन आणि पाणी या नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. पाण्याचा योग्य व गरजेपुरताच वापर करण्याचे बंधन आपण प्रत्येकाने पाळले तर उपलब्ध पाणीसाठा आवश्यक प्रमाणात मिळेल.
कार्यशाळेचे प्रास्ताविक नंदकुमार यांनी केले. आर्दड यांनी वाल्मी संस्थेबाबत माहिती दिली. प्रा. पुराणिक यांनी आभार मानले. या कार्यशाळेत मग्रारोहयोची भूमिका, आदर्श गाव संकल्पना, शासन निर्णय, विविध अधिकारी अनुभव, पाणी फाऊंडेशनचे काम मृद व जलसंधारण, स्वयंसेवी संस्थांची भूमिका यासह इतर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
जलसंधारणाला मनरेगाची जोड
रोहयोमंत्री भुमरे म्हणाले, रोहयोअंतर्गत रस्ते, विहिरी, शेततळे, रेशीम लागवडीसह अनेक उपयुक्त कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. मनरेगाची जोड देऊन शेतीविषयक, मृद व जलसंधारणची अधिकाधिक कामे करण्यावर भर देण्यात येईल.