औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतींवर दोन दिवस जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:56 AM2018-05-31T00:56:15+5:302018-05-31T00:56:47+5:30
शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद, जालना औद्योगिक वसाहतीला १ जून रोजी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ जून रोजी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद, जालना औद्योगिक वसाहतीला १ जून रोजी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ जून रोजी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सलग दोन दिवस औद्योगिक वसाहतींवर जलसंकटाचा फेरा राहणार आहे. एकतर पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच एमआयडीसीने ७०० मि.मी.च्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरविल्यामुळे औद्योगिक वसाहतींना पाणीटंचाई भासत आहे.
एमआयडीसी चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभावर टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून, २१ मेपासून उद्योजक संघटना एमआयडीसीसोबत बैठका घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहे. ६ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा भार एमआयडीसीवर पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. २०० हून अधिक टँकर एमआयडीसीच्या जलकुंभावरून भरले जात आहेत. पूर्ण क्षमतेने पाणी उपसा १००० मि. मी. व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने ७२ एमएलडी पाण्याचा उपसा सध्या करते आहे.
एमआयडीसीने कळविले आहे की, महामंडळाच्या ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे औरंगाबाद, चिकलठाणा, शेंद्रा व जालना औद्योगिक क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा १ जून रोजी बंद राहील. तसेच २ जून रोजी ३ वाजेनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी कळविले आहे.