लहुकी प्रकल्प कोरडा पडल्याने १४ गावांवर जल संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 08:02 PM2019-01-22T20:02:40+5:302019-01-22T20:10:40+5:30
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे.
दुधड (औरंगाबाद ) : औरंगाबाद तालुक्यातील दुधड येथील लहुकी मध्यम प्रकल्प जानेवारी महिन्यातच कोरडा पडला आहे. सध्या धरणातील विहिरीला पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने दुधड,करमाड व शेंद्राबन पाठोपाठ चौदा गावांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.
दुधड परिसरातील लहुकी या मध्यम प्रकल्पातून शेतीपाठोपाठ करमाड, दुधड, गाढेजळगाव, शेवगा, भांबर्डा, बनगाव, जयपूर, कुबेर-गेवराई, वरुड, वरझडी, करंजगाव, मुरुमखेडा, वडखा, शेंद्राबन या चौदा गावांना या धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथील पाणी पातळीत कमालीची घट होत आहे.
पाणी पुरवठा करण्यासाठी धरण परिसरात असलेल्या विहिरीत पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणी पुरवठा आहे. यामुळे यावर अवलंबून असलेल्या गावांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे.