औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:01 PM2018-07-03T15:01:34+5:302018-07-03T15:02:06+5:30
टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात जून महिना कोरडाच गेल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट वाढले आहे. टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. बहुतांश तालुक्यांत समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिण्याचे पाणी टँकरने पुरवठा करावा लागणार आहे.
पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा पुढे पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. जून मध्यापर्यंत ६०० च्या आसपास टँकर सुरू होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात जवळपास १९६ गावे आणि ७२ वाड्यांत पाणीटंचाई असल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. यात गंगापूर १११, पैठण ४६, सिल्लोड ६२, फु लंब्री २०, वैजापूर ३ टँकर, असे एकूण २४२ टँकर सुरू आहेत.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन व परिसरात पाण्यासाठी भयावह परिस्थिती आहे. ग्रामस्थांना पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी पत्र्यांच्या पन्हाळाखाली ड्रम भरून ठेवावे लागत आहेत. अशातच टँकरने होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार ३० जूनपर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो, त्यानंतर टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. त्याकरिता जुलै महिन्याचे काही दिवस टँकर सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
शासनाकडे पाठविला प्रस्ताव
जिल्ह्यात टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील किती गावांना टँकरची गरज आहे, त्याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत.जून महिन्यापर्यंत टंचाई आराखडा मंजूर असतो; मात्र यंदाच्या जून महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्यामुळे जुलै महिन्यातील काही दिवस गरजेप्रमाणे टँकर सुरू ठेवण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.