औरंगाबादकरांवर जल संकट; पाणीपट्टी थकल्याने २७ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाणी होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 07:20 PM2018-12-20T19:20:21+5:302018-12-20T19:22:45+5:30
पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले.
औरंगाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या मनपावर आणखी एक नामुष्की ओढावली आहे. जायकवाडी धरणातून दररोज उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल तब्बल १० कोटींहून अधिक थकले आहे. तब्बल १७ नोटिसा पाठविल्यानंतरही महापालिकेने पाणीपट्टी भरण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला अंतिम नोटीस पाठवून २७ डिसेंबरपासून चक्क पाणीपुरवठाच बंद करण्याचा इशारा दिला आहे.
जायकवाडी धरणातून महापालिकेने शहरासाठी वार्षिक ११३.२८ दलघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे. रोज १५० एमएलडी पाणी मनपा धरणातून घेत आहे. मनपा प्रशासन जेवढे पाणी धरणातून घेत आहे, त्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून आकारले जाते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. महापालिकेने नेहमी या नोटिसीला केराची टोपली दाखविली. परिणामी, नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावे, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही बजावले आहे. पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही मनपा कुंभकर्णी झोपेत आहे. मागील दोन महिन्यांपासून कंत्राटदारांना एक छदामही अदा करण्यात आलेला नाही. तिजोरीत ३० ते ३५ कोटी रुपये पडून आहेत. शहराचे पाणी बंद होऊ नये म्हणून पाणीपट्टी भरण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही, हे विशेष.
२४ तास मनपाकडून उपसा
शहरातील १६ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका जायकवाडी येथून ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्यांद्वारे २४ तास पाण्याचा उपसा करीत आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही योजनांसाठी सहा पंप २४ तास चालवावे लागतात.
पाणी कपातीचा कार्यक्रम
२७ डिसेंबर - जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.
२८ डिसेंबर - चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.
२९ डिसेंबर -सहा तास उपसा बंद राहील.
३० डिसेंबर - आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.
३१ डिसेंबर - पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल.