औरंगाबादेत पाणी प्रश्न पेटला; महापालिका आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांमुळे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:49 PM2022-05-13T16:49:42+5:302022-05-13T17:39:26+5:30
कार्यालयाबाहेर पडताना आयुक्तांना मागणीचे निवेदन देताना हल्ला करण्याचा प्रयत्न
औरंगाबाद: आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर दोघांनी पाणी प्रश्नांवर निवेदन देण्याच्या बहाण्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास महापालिकेत आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर घडली. राहुल इंगळे आणि योगेश मगरे अशी हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय कामकाज आटोपून दुपारच्या जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडत होते. यावेळी बाहेर राहुल इंगळेने पाणी प्रश्नांवरील मागणीचा कागदी फलक आयुक्तांना देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आयुक्त पाण्डेय यांनी हा प्रश्न माहित असून ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे असे सांगितले. यावर इंगळे याने आयुक्तांना अडविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, इंगळे याच्यासोबत असणारा योगेश हरिशचंद्र मगरे ( रा. सेक्टर-जे, एन. २, सिडको, मुकुंदवाडी ) हा या सर्व प्रकारचे स्वतःच्या मोबाईल मध्ये छायाचित्रीकरण करत होता. महापालिका सुरक्षा रक्षक शेकनाथ किसान तांदळे व सुखदेव केशव बनकर यांनी त्यास समज दिली. तरीही मगरेने छायाचित्रीकरण सुरूच ठेवले. तसेच राहुल इंगळे अरेरावीची भाषा करत आयुक्त पाण्डेय यांच्या अंगावर धाऊन गेला. मात्र, सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्याने आयुक्त बचावले. या सर्व प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी इंगळे आणि मगरे यांना ताब्यात घेतले. चौकशी करत असताना दोघांनी आरडाओरडा करत अरेरावीची उत्तरे दिली.
याप्रकरणी महापालिका उपायुक्तांनी सिटीचौक पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना एक पत्र दिले आहे. यानुसार राहुल इंगळे आणि योगेश मगरे यांच्या विरोधात आयुक्तांवर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, विनापरवाना शासकीय कार्यालयात छायाचित्रीकरण करणे, शासकीय कार्यालयाची शांतता भंग करणे इत्यादी बाबींसाठी गुन्हा दाखल करावा. यासाठी सुरक्षारक्षक शेकनाथ किसान तांदळे व सुखदेव केशव बनकर हे घटनास्थळी हजर असल्याने त्यांना गुन्हा दाखल करणेसाठी प्राधिकृत करण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. या प्रकरणी अद्याप सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.