जीर्ण संरक्षक भिंतीमुळे विद्यापीठाच्या ग्रंथालयात शिरले पाणी; प्रशासनाची दिवसभर स्वच्छता मोहीम
By राम शिनगारे | Published: September 27, 2024 03:58 PM2024-09-27T15:58:19+5:302024-09-27T15:58:50+5:30
विद्यार्थ्यांसह ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मौल्यवान ग्रंथसंपदा वाचली.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधील ऐतिहासिक ग्रंथालयामध्ये बुधवारी मुसळधार पावसामुळे पाणी शिरले. विद्यार्थ्यांसह ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मौल्यवान ग्रंथसंपदा वाचली. ग्रंथालयाच्या तळघराच्या बाजूने असलेली संरक्षक भिंती पूर्णपणे जीर्ण झाली आहे. त्यामधून बाहेरील पाणी तळघरात आले. या तळघराजवळील ड्रेनेजमध्ये ते पाणी गेले नाही, त्यामुळे ग्रंथालयात पाणी शिरल्याचे गुरुवारी समोर आले.
ग्रंथालयाच्या तळघरात पाणी शिरल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करून पाणी बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून तुंबलेले ड्रेनेज साफ केले. कर्मचारी रात्रभर पावसावर आणि पाण्यावर लक्ष ठेवून होते, अशी माहिती ग्रंथालयाच्या संचालक डॉ. वैशाली खापर्डे यांनी सांगितले. तळघराच्या बुकशेल्फच्या दोन कप्प्यातील ग्रंथ उचलण्यात आल्यामुळे एकही ग्रंथ भिजला नाही. तळघराच्या बाजूने इमारतीचे पाणी जाण्यासाठी एक ड्रेनेज बनविण्यात आलेले आहे. या ड्रेनेजच्या बाजूलाच संरक्षक भिंत बांधलेली आहे. या संरक्षक भिंतीच्या वरील बाजूने पाणी साचून ते भिंतीमधून तळघराच्या ड्रेनेजच्या नालीमध्ये उतरले. हे पाणी अधिकचे असल्यामुळे दरवाजासह इतर मार्गाने पाणी तळघरात पोहोचल्याचेही डॉ. खापर्डे यांनी सांगितले. जेव्हा तुंबलेले ड्रेनेज मोकळे केले तेव्हा पाणी सुरळीतपणे गेले. त्याचवेळी अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी तळघरातील पाणी काही वेळातच बाहेर फेकले. त्यानंतर गुरुवारी दिवसभर तळघराची स्वच्छता करण्यात येत होती. ड्रेनेजच्या पाण्यामुळे तळघरातून दुर्गंधी येत होती. ती स्वच्छ करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात येत असल्याचे दिसून आले. त्याचवेळी संरक्षक भिंतीच्या बाजूला आलेले गवत, घाणही साफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मालमत्ता विभागाकडे पत्रव्यवहार
विद्यापीठातील मालमत्तेची देखभाल करणाऱ्या मालमत्ता विभागाकडे संरक्षक भिंतीच्या परिसरासह ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी ग्रंथालयातर्फे पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, नेहमीप्रमाणेच त्याकडे मालमत्ता विभागाने दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे. ग्रंथालयात पाणी शिरल्यामुळे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे, डॉ. उमाकांत राठोड, प्रा. हरिदास (बंडू) सोमवंशी, प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी प्रशासनासोबत याविषयी संवाद साधला. तसेच ग्रंथालयाला भेट दिल्याचे दिसून आले.