एकीकडे पाण्याची मारामार; दुसरीकडे योजनांचा भडिमार; जायकवाडी धरणावरच आहे भिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 07:29 PM2022-06-21T19:29:50+5:302022-06-21T19:30:55+5:30
१२ वर्षांत केवळ ४ वेळाच भरले जायकवाडी धरण, २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन यावरच
औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी धरणावरच २०५० सालापर्यंतच्या लोकसंख्येसह उद्योगांना, शेतीला लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. मागील १२ वर्षांचा धरणाचा आढावा घेतला तर फक्त चार वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले, सात वेळा धरण मृतसाठ्यात गेले, तर एका वर्षी ९० टक्क्यांपर्यंत धरणात पाणी होते. जायकवाडीची अशी परिस्थिती समोर असताना नवीन पाणीपुरवठा योजनांचा भडिमार केला जात आहे.
महापालिका व झालर क्षेत्रासाठी जलवाहिन्यांचे नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे वाळूज परिसर, शेंद्रा व डीएमआयसीची भविष्यातील गरज समोर ठेवूनही नियोजन केले जात आहे. या सगळ्या पाणीपुरवठा योजनांसाठी जायकवाडीच केंद्रस्थानी असणार आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत. परळीचे वीजनिर्मिती करणारे औष्णिक वीज केंद्रसुद्धा याच पाण्यावर अवलंबून आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्याची लांबी ही तब्बल २०८ कि.मी. आहे. जायकवाडीतून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सुटते. याच धरणावर औरंगाबाद आणि जालना या दोन शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. ४०० गावांची तहानही जायकवाडीच भागवते. औरंगाबादमधील वाळूज, शेंद्रा, (डीएमआयसी) चिकलठाणा, पैठण आणि जालना औद्योगिक वसाहतीसुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत.
जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरी धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यांतील गावांसह औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३० ते १४० एमएलडी पाणीपुरवठा होतो. उद्योगांना रोज ५२ ते ६० एमएलडी पाणीउपसा होतो. म्हणजेच औरंगाबादला रोज २ ते ३ द.ल.घ.मी. पाणी लागते. मृत जलसाठ्यातून पाणीउपसा सुरू केल्यानंतर साधारणत: दीड वर्ष पाणीपुरवठा होणे शक्य आहे. मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द.ल.घ.मी. आहे. २५० दलघमी पाणी मृतसाठ्यातून मिळते. जायकवाडीत सध्या ३२ टक्के पाणीसाठा आहे.
१०.२० टीएमसी पाणी आरक्षित
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत फेब्रुवारी २०२१ मध्ये सांगितल्यानुसार जायकवाडीत ७.५५ टीएमसी गाळ आहे. सुमारे ९.६७ टीएमसी बाष्पीभवन होते. माजलगाव धरणाला ४.०६, औरंगाबाद पालिकेला १.५५, जालना शहराला ०.२६, २५० गावांना ०.५१ टीएमसी, गेवराई शहराला १.८३, सर्व एमआयडीसी ०.५७ टीएमसी, परळी औष्णिक १.४१ तर आकस्मिक पिण्याच्या आरक्षणासाठी ४.०६ असे १०.२० टीएमसी पाणी आरक्षित आहे.
शहरासाठी अशा योजना, असा उपसा
औरंगाबाद शहर सध्या : १३० ते १४० एमएलडी दररोज उपसा
एमआयडीसी : ५६ एमएलडी दररोज उपसा
एमआयडीसी, जालना, डीएमआयसी संयुक्त : ७२ एमएलडी (२० एमएलडी डीएमआयसी)
प्रस्तावित योजना
नवीन पाणीपुरवठा योजना : ६०५ एमएलडी
झालर प्रस्तावित योजना : १२२ एमएलडी