महामार्गावरील पाणी थेट गावात शिरले, दहा कुंटूबियांनी घेतला मंदिराचा आसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 07:31 PM2021-10-09T19:31:55+5:302021-10-09T19:32:05+5:30
खुलताबाद- फुलंब्री राष्ट्रीय महामार्गावर नालीबांधकाम नसल्याने घरात पाणी घुसले
खुलताबाद: खुलताबाद - फुलंब्री या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असतांनी अनेक ठिकाणी नाली व पाण्याचा निचरा होईल असे काम न केल्याने शेताबरोबरच आता ममनापूर येथील काही ग्रामस्थांच्या घरात पाणी घुसत आहे. यामुळे जवळपास दहा कुंटूबियांना मंदीरात झोपावे लागत आहे.
खुलताबाद - फुलंब्री या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. काम करीत असतांना गावातील घरांचा व शेतीचा विचार न करता पाण्याचा निचरा होईल याबाबत कुठलेही काम झाले नाही. तसेच अनेक गावाजवळ नाली बांधकाम न केल्याने शेतात तसेच घरात कमरेएवढे पाणी शिरले आहे. याचाच फटका ममनापूर येथील दहा कुंटूबियांना बसला असून घरात पाणी शिरल्याने हे दहा कुंटूबियांना कधी शाळेत तर कधी मंदीरात झोपावे लागत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ठ कामाबाबत लोकप्रतिनिधी काहीही बोलत नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत भडजी- ममनापूरचे माजी सरपंच अजय जाधव म्हणाले की, सराई, भडजी, ममनापूर, गदाणा परिसरातील महामार्गाच्या कडेला असलेल्या भागात पाण्याचा निचरा होत नाही. नाली बांधकाम नसल्याने शेतात पाणी साचून पिके खराब झाली आहेत. ममनापूर येथील दहा कुंटूबियांना आम्ही मंदीर व शाळेत स्थलांतर केले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.