गोदापात्रात सोडले जायकवाडी जलविद्युत निर्मिती केंद्रातून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:37 AM2018-04-17T01:37:05+5:302018-04-17T13:02:06+5:30
जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.
पैठण : जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून सोमवारी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. आपेगाव व हिरडपुरी या निम्न बंधाऱ्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या जवळपास १८ गावांचा पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत सुटणार आहे.
नाथसागराच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून (हॅड्रो) गोदावरी पात्रामध्ये सोमवारी सायंकाळी ५ वाजता पाणी सोडण्यात आले. तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत दगडी धरण अभियंता अशोक चव्हाण व ‘हॅड्रो’चे उपकार्यकारी अभियंता उमेश सोन्ने यांनी स्वयंचलीत यंत्राचे बटन दाबून प्रतिसेकंद १ हजार ६०० क्युसेक्स प्रमाणे पाणी सोडले. यावेळी आ. भुमरे यांचे स्वीय सहायक नामदेव खराद उपस्थित होते. एकूण १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार असून यात दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरणार आहेत.
पाणीटंचाई लक्षात घेता गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, यासाठी आ. संदीपान भुमरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गोदावरीवर बांधलेला आपेगाव निम्नबंधारा ७.५० दशलक्ष घनमीटर जलसाठवण क्षमतेचा असून आजमितीस हा बंधारा कोरडाठाक पडलेला आहे. ८ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या हिरडपुरी बंधाºयानेही तळ गाठला आहे. सिंचनासाठी गोदावरी पात्रातून पाणी सोडण्यात येऊन आपेगाव व हिरडपुरी बंधारे भरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत १४ एप्रिल रोजी लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पैठणपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेला आपेगाव निम्नबंधारा व २१ किलोमीटरवरचा हिरडपुरी बंधारा या पाण्याने भरून घेतला जाणार आहे. जवळपास ३५ हजार लोकसंख्या असलेल्या या नदीकाठच्या परिसरातील हजारो जनावरांना याच लाभ मिळणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून जायकवाडी धरणातून दोन्ही बंधाºयांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची दखल घेऊन पाणी सोडले आहे, असे भुमरे म्हणाले.
गोदाकाठी सतर्कतेचा इशारा
नाथसागर जलाशयातून १५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग जलविद्युत निर्मिती केंद्राच्या आऊट लेटमधून करण्यात येणार आहे, असा संदेश देण्यात आला. सदरील पाणी हे आपेगाव-हिरडपुरी बंधाºयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
४या वेळेनंतर पाणी स्थिर होईपर्यंत कोणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये किंवा आपली जनावरे, मालमत्ता नदीपात्रात घेऊन जाऊ नये, आपापल्या जीविताचे व मालमत्तेचे स्वसंरक्षण करावे, असे आवाहन तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.
१४ गावे : गोदावरी नदीकाठावर १४ गावे असून यातील पैठण, पाटेगाव, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, घेवरी, तळजापूर व हिरडपुरी आदी गावांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय २० गावांना अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.