‘जलयुक्त’ला घरघर
By Admin | Published: May 12, 2017 11:32 PM2017-05-12T23:32:34+5:302017-05-12T23:33:49+5:30
बीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही.
राजेश खराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक कामे प्रक्रियेतच रखडली आहेत. गतवर्षी मे अखेरीस पहिला टप्पा पूर्ण झाला होता. मात्र, यंदा २३६९ कामांपैकी केवळ दोन हजार कामे पूर्ण झाली आहेत.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलसंधारणाच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याकरिता २५६ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी २७१ गावांमध्ये दर्जात्मक कामे झाली होती. शिवाय, समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्याचे चित्र पलटले होते. मात्र, जलसंधारणाचे गांभीर्य संबंधित विभागांना राहिले नसल्याने कामे कासवगतीने सुरू आहेत. प्रगतीपथावरील कामांची आकडेवारी दाखवून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून धूळफेक केली जात आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या तोडीस जलसंधारणाकरिता सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा, नाम फाऊंडेशनची कामे प्रगतीपथावर असून, यामध्ये लोकसहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम जलयुक्त शिवार अभियानावरही झाला असल्याचे दिसून येत आहे.
परळी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असून, उप विभागीय, जिल्हाधिकारी समिती व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवायच सहायक पर्यवेक्षक स्तरावरच कामांना मंजुरी दिली जात असल्याने अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे प्रस्तावाबाबतची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाकडे नसल्याने अवमेळ होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या अभियानावर लक्ष केंद्रित करून पहिला टप्पा यशस्वी केला होता.
दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरूवात होताच जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे समीकरण सुरू झाल्याने मूळ कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नूतन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाच्या अनुषंगाने मंगळवारी आढावा बैठक ठेवली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात कामे झाले नाहीत त्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.