औरंगाबादच्या भूजल पातळीत दरवर्षी दोन मीटरने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:05 AM2019-05-03T00:05:13+5:302019-05-03T00:05:34+5:30
सतत दुष्काळास सामोरे जाणाऱ्या औरंगाबादच्या पाणी पातळीत दरवर्षी घटत होत असून, दरवर्षी सरासरी दोनने कमी होऊन ५ वर्षांत १२ मीटरने खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणतर्फे यंदा मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यात पुन्हा २ मीटरची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष अधिक जटिल होताना दिसत आहे.
- साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : सतत दुष्काळास सामोरे जाणाऱ्या औरंगाबादच्यापाणी पातळीत दरवर्षी घटत होत असून, दरवर्षी सरासरी दोनने कमी होऊन ५ वर्षांत १२ मीटरने खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणतर्फे यंदा मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यात पुन्हा २ मीटरची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष अधिक जटिल होताना दिसत आहे.
भूजल सर्वेक्षणतर्फे जिल्ह्यातील १४१ स्थिर निरीक्षण विहिरींतील पाणी पातळीची गत ५ वर्षांतील सरासरी आकडेवारी घेतली असता धक्कादायक अवस्था दिसते आहे. मागील पाच वर्षांत भूजल पातळी सरासरी ११.४८ मीटर (४० फूट) खोल गेली. यंदा २०१९ मार्च महिन्यात ही पाणी पातळी आणखी दोन मीटरने खालावली आहे. जमिनीतील पाणी पातळीत वाढ किंचितही जाणवत नसून, ती वरच्या वर पुन्हा खालावत असल्याचे भयावह चित्र समोर आहे. उन्हाचा पारा वाढला असून, जमिनीतील पाणी पातळीत झपाट्याने घट झालेली आहे. मे महिन्याची सुरुवात झाली असून, यंदाचा मान्सून कसा असेल, याविषयी अद्याप काही सांगता येत नाही. दरवर्षीचा हवामानाचा अंदाज अचूक ठरला नसल्याने शेतकरीही चिंतातुरच आहेत. सध्याच चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड्यातही टँकरच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. जनावरांच्या चारा छावण्या सुरू झाल्या आहेत; परंतु पाणी प्रश्न सतावतो आहे.
याविषयी कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. शरद गायकवाड म्हणाले की, भूजल पातळीची मागील ५ वर्षांतील स्थिर भूजल पातळीशी तुलनात्मक स्थिती तपासली आहे. त्यात सतत घट दिसते आहे. मे महिन्यातील शेवटी पुन्हा स्थिती मोजली जाणार आहे.
झपाट्याने घट होत आहे
जिल्हाभरात पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून, यंदा पुन्हा २ मीटरने घट झालेली आहे. ही आकडेवारी मार्च २०१९ ची आहे. कमी पर्जन्यमानाने भूगर्भात पाणी पातळीत वाढ झालेलीच नाही.
-डॉ. पी. एल. साळवे, उपसंचालक
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, औरंगाबाद विभाग