शहरात नळांना मीटर बसवावेच लागतील : आस्तिक कुमार पाण्डेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 08:00 PM2020-08-08T20:00:35+5:302020-08-08T20:02:51+5:30
१६८० कोटी रुपयांच्या योजनेमध्ये नळांना मीटर बसविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आलेला नाही.
औरंगाबाद : शहराच्या विकासाला गती देण्यासाठी नियोजित नवीन पाणीपुरवठा योजना अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. १६८० कोटी रुपयांच्या योजनेमध्ये नळांना मीटर बसविण्याच्या कामाचा समावेश करण्यात आलेला नाही. स्मार्ट सिटी योजनेतून नळांना मीटर बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मीटरशिवाय नागरिकांना पाणीच मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांना मीटर बसवावे लागतील, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
राज्य शासनाने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र, राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर योजनेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरूच ठेवली होती. पाणीपुरवठा योजनेबाबत माहिती देताना महापालिकेचे प्रशासक पाण्डेय म्हणाले की, योजनेचे काम लवकरच मार्गी लागेल, सध्या ही फाईल शासनाच्या नगरविकास खात्याकडे आहे. त्यानंतर वित्त विभागाची मंजुरी घ्यावी लागेल. राज्य शासनाने महापालिकेच्या हिश्श्याचा निधी भरण्याची हमी घेतली आहे. या योजनेत नळांना मीटर बसविले जाणार आहेत. त्यासाठी स्मार्ट वॉटर योजनेंतर्गत स्मार्ट सिटीतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या पाण्याचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी व कमी वापर करणाऱ्यांसाठी समानच दर आहेत.
मीटर बसविल्यानंतर नागरिकांना पाण्याच्या वापरानुसार पैसे भरावे लागतील. त्यात अनेकांचा सध्याच्या पाणीपट्टीपेक्षा कमी बिल येऊ शकते. त्यामुळे विरोध होण्याचे कारण नाही. नागपूर, नाशिकसह अनेक शहरांनी नळांना मीटर बसविले आहेत. आपण किती दिवस टाळणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुण्याच्या एजन्सीची नियुक्ती
वॉटर मीटरसंदर्भात पुण्याच्या ब्लू स्ट्रीम या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे लोक प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात शहरात येणार आहेत.४ अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर प्रकल्पावर किती खर्च होईल, याचा अंदाज येईल, असे स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले. १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद शहरासाठी मंजूर केली आहे.
पाच रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण
शहरातील पाच रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केंद्र शासनाने रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेला निधी दिला होता. त्यातून महावीर चौक ते आमखास मैदान रस्ता दुभाजक विकसित करण्यात आले. याच धर्तीवर पाच रस्ते दुभाजकांची कामे केली जाणार आहेत. शहरातील पाच ठिकाणच्या रस्ते दुभाजकाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून महावीर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीचौक, जामा मशीद ते अण्णाभाऊ साठे पुतळा (जिल्हाधिकारी कार्यालय), जिल्हाधिकारी कार्यालय ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते हडको टी पॉइंट तसेच अण्णाभाऊ साठे चौक ते दिल्लीगेट रस्ता दुभाजकाचे सुशोभीकरण केले जाणार आहे.