पाणीमिश्रित इंधनामुळे गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:44 AM2017-11-10T00:44:55+5:302017-11-10T00:45:05+5:30
उस्मानपु-यातील युनिक आॅॅटो पेट्रोलपंपावर इंधन भरताना पाणीमिश्रित इंधन मिसळल्याची तक्रार काही तरुणांनी केल्याने बराच वेळ या पंपावर गोंधळ उडाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उस्मानपु-यातील युनिक आॅॅटो पेट्रोलपंपावर इंधन भरताना पाणीमिश्रित इंधन मिसळल्याची तक्रार काही तरुणांनी केल्याने बराच वेळ या पंपावर गोंधळ उडाला. अनेक संतप्त वाहनचालकांनी गुरुवारी दुपारी पंप व्यवस्थापनाला याबाबत जाब विचारल्याने गोंधळ घातला. भेसळीचा मात्र पंपचालकांनी इन्कार केला असून नमुने तपासणीनंतर सर्व स्पष्ट होईल, असे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
उस्मानपुरा येथील गोपाल टीजवळ मे. युनिक आॅटो नावाचा पंप आहे. या पंपावर बन्सीलालनगर येथील रोहित धूत यांनी त्यांच्या दुचाकीमध्ये शंभर रुपयांचे पेट्रोल भरले. यानंतर ते पंपावरून एक ते दोन किलोमीटरपर्यंत गेल्यानंतर गाडी अचानक बंद पडली. गाडी सुरू झाली की सारखी बंद पडायची, त्यामुळे त्यांनी इंधन टाकीत एअर अडकला असेल असे समजून एका पाण्याच्या प्लास्टिक बाटलीत टाकीतील पेट्रोल काढले असता एक लिटरच्या बाटलीत सुमारे शंभर मिलीलिटर पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, असे त्यांनी सांगितले. देवगिरी कॉलेजमध्ये शिकत असलेला आकाश पवार (रा.बीड) यानेही सकाळी त्याच्या दुचाकीत इंधन टाकले असता त्याची दुचाकीही सारखी बंद पडू लागल्याने त्यानेही एका बाटलीत गाडीतील पेट्रोल काढून पाहिले असता त्यात बाटलीच्या तळाशी पाणी साचल्याचे तो म्हणाला. अभिजित अरकीलवार यालाही तसाच अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. तर मयूर पाटील यांनी त्यांच्या वाहनात याच पंपावरून इंधन टाकले. गाडी सारखी बंद पडू लागल्याने त्यांनी गाडी कशीतरी गॅरेजवर नेली. यावेळी गॅरेजवाल्याने त्यांना इंधनमध्ये भेसळ असल्याचे सांगितले. याशिवाय ज्या लोकांनी या पंपावर इंधन भरले, त्यातील बहुतेक सर्वांना पाणीमिश्रित इंधन मिळाल्याच्या तक्र ारी घेऊन शंभरहून अधिक वाहनचालक दुपारी या पंपावर गेले. तिथे व्यवस्थापकांकडे याविषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तक्रारदार संतप्त झाले. यामुळे गोंधळ वाढू लागला. यामुळे गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह अन्य अधिका-यांनी धाव घेतली.