पाण्याची होतेय १२ टक्के तूट!
By Admin | Published: May 4, 2016 12:13 AM2016-05-04T00:13:06+5:302016-05-04T00:18:19+5:30
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजहून दररोज २५ लाख व स्थानिक स्त्रोतातून जवळपास ३५ ते ४० लाख लिटर्स पाणी येत आहे़
पाणी येते ६५ लाख तर वितरण ६० लाख लिटर
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजहून दररोज २५ लाख व स्थानिक स्त्रोतातून जवळपास ३५ ते ४० लाख लिटर्स पाणी येत आहे़ टँकरद्वारे होणारी वाहतूक, जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याचे शुध्दीकरण यात १२ टक्के तूट असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़ शिवाय, १४ नळाद्वारे १० लाख पाणी वितरण होत असून पोलीस मुख्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र, कारागृहातही मनपाचे पाणी दिले जात आहे़ रेल्वे, बेलकुंड, डोंगरगाव येथून लातूरला टँकरने पाणी दिले जात आहे़ मिरजहून दररोज २५ लाख लिटर्स पाणी येत आहे़ तर डोंगरगाव, बेलकुंड येथून ८० टँकरद्वारे पाणी संकलित केले जात आहे़ येथून दररोज ४० ते ४५ लाख लिटर्स पाणी आणले जात आहे़ हरंगुळच्या जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी संकलित करून त्याचे शुध्दीकरण केल्यावर ७ टक्के पाण्याची तूट होत आहे़ तर वाहतुकीत ५ टक्के पाण्याची घट होत आहे़ आर्वीच्या जलशुध्दीकरण केंद्रात रेल्वेने आलेल्या पाण्याचे जलशुद्धीकरण केल्यावर हे पाणी भांबरीमार्गे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या टाकीत आणून तेथून इतर टाक्यावर पाणी वितरित होत आहे़ यासाठी १० किलोमीटर जलवाहिनीवरील लिकेज काढून दोन दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे़ यामुळे कमी वेळेत इतर टाक्यावर पाणी पोहचविणे शक्य झाले आहे़ एकंदर संकलित झालेल्या पाण्याची १२ टक्के तूट होत आहे़ (प्रतिनिधी) पाणी येते कसे अन् जाते रेल्वेचे २५ लाख आणि स्थानिक स्त्रोतातील ३५ लाख लिटर पाणी १३५ टँकरद्वारे शहरात वितरीत केले जाते़ आर्वी टाकी २, गांधी चौक १, सरस्वती कॉलनी टाकी २, विवेकांनद टाकी २, एमजेपी टाकी १, वसवाडी १, हरंगुळ केंद्र १ असे एकूण १२ नळ २४ तास सुरू आहेत़ याठिकाणाहून १० लाख लिटर्स व पोलीस मुख्यालय, ट्रेनिंग सेंटर, कारागृह आदी ठिकाणी ३ लाख लिटर्स पाणी जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़ टँकर वाहतूकीतून १२ टक्के तूट होते़ सीसीटीव्ही आॅनलाईऩ़़ टँकरचे पाणी वितरण करणाऱ्या आर्वी, नांदेड नाका, सरस्वती कॉलनी, गांधी चौक येथील टाकी या चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ याठिकाणची सर्व माहिती नागरिकांना मिळावी म्हणून वेबसाईटवर कॅमेरे आॅनलाईन असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली़