आठवड्यातून एकदा पाणी, ते सुद्धा वेळेवर नाही; छत्रपती संभाजीनगरात नागरिक प्रचंड त्रस्त

By मुजीब देवणीकर | Published: December 1, 2023 06:55 PM2023-12-01T18:55:52+5:302023-12-01T18:56:30+5:30

पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे.

Water once a week, even if not on time; Citizens of Chhatrapati Sambhajinagars are suffering a lot | आठवड्यातून एकदा पाणी, ते सुद्धा वेळेवर नाही; छत्रपती संभाजीनगरात नागरिक प्रचंड त्रस्त

आठवड्यातून एकदा पाणी, ते सुद्धा वेळेवर नाही; छत्रपती संभाजीनगरात नागरिक प्रचंड त्रस्त

छत्रपती संभाजीनगर : महापालिका नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी देत आहे. त्यातही पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नाही. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी पाणी येते. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना पाण्याच्या दिवशी इतर कामे बाजूला ठेवावी लागतात. पाण्यासाठी अनेकदा लग्न कार्य, दु:ख प्रसंगातही कुठे ये-जा करता येत नाही. नागरिकांच्या या गंभीर प्रश्नाशी प्रशासनाला काहीच देणेघेणे नाही. उलट पाणीपुरवठ्याची अत्यंत बिकट, कालबाह्य यंत्रणा असतानाही आम्ही पाणी देतोय, असा प्रशासनाचा तोरा आहे.

शहराला सध्या २२० एमएलडी पाण्याची दररोज गरज आहे. महापालिका जायकवाडीतून दररोज १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात आणते. कागदावर येणारे पाणी आणि शहराची मागणी याची गोळाबेरीज केली तर मोठी तफावत दिसते. अनेक तज्ज्ञांनी यावर काथ्याकूट केला. मात्र, प्रशासन नियोजनात आम्ही कमी पडतोय, हे मान्य करीत नाही. त्यामुळे शहरातील ८० टक्के वसाहतींना ७ व्या दिवशी उर्वरित वसाहतींना ८ व्या आणि ९ व्या दिवशी पाणी मिळते. ‘लोकमत’ने शहरातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांकडे पाणी कितव्या दिवशी येते, याची विचारणा केली. बहुतांश नागरिकांचे आठवड्यातून एकदाच, असे उत्तर होते.

३६५ पैकी ४८ दिवस पाणी
वर्षातून फक्त ४८ दिवस महापालिका नागरिकांना पाणी देते. कोणत्या वसाहतीला किती वेळ पाणी द्यायचे हे कागदावर लिहिलेले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती निराळीच असते. कोणाला ४ तास तर कोणाला ८ तास पाणी देण्यात येते. या वसाहती कोणत्या, हे पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

म्हणून पाणीपट्टी भरेनात
पूर्वी पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये होती. दोन वर्षांपूर्वी पाणीपट्टी २ हजार ५० रुपये करण्यात आली. त्यानंतरही नागरिक पाणीपट्टीच भरत नाहीत. दरवर्षी पाणीपुरवठ्यावर मनपाला १२० ते १३० कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेत पाणीपट्टी २० कोटीही वसूल होत नाही.

अनेक वॉर्डात राजकारण वेगळेच
काही माजी नगरसेवक वॉर्डातील नागरिकांना दुपारी ३ वाजता पाणी येणार असा मेसेज मोबाईलवर पाठवतात. पण पाणी लवकर किंवा उशिरा येते. कारण माजी नगरसेवकाचे विरोधक मेसेजला खोडून काढण्यासाठी लाइनमनला हाताशी धरतात. याचा त्रास सर्वसामान्यांना होतोय, याची जाणीव कोणालाच नाही.

नागरिकांची मोजणीच चुकीची
ज्या दिवशी पाणीपुरवठा होतोय, तो दिवस मोजायचा नाही. त्यानंतर पाच दिवस, सहा दिवस गॅप असतो. शहरात सध्या चार आणि पाच दिवसांआड पाणी देतोय. उलट काही भागात एक दिवस आणखी कमी केला. वेळेचेही काटेकोर पालन करतोय. तांत्रिक बिघाड, अडचण निर्माण झाली तरच वेळ मागेपुढे होतो.
- के. ए. फालक, कार्यकारी अभियंता, मनपा.

कोणत्या भागात पाणी कधी?
वसाहत-------कितव्या दिवशी
एन-२ सिडको- ६
ईटखेडा-नक्षत्रवाडी-७
रामनगर-मुकुंदवाडी-८
हडको एन- ११ परिसर - ७
गारखेडा-शिवाजीनगर-७
दिवाणदेवडी-शहागंज-७
ब्रिजवाडी-नारेगाव- ८
सिडको एन-८ परिसर --७
गणेश कॉलनी-रशीदपुरा ९
भडकलगेट-टाऊन हॉल- ६
सिडको एन-६ परिसर --६
गुलमंडी-धावणी मोहल्ला-८
आकाशवाणी-त्रिमूर्ती चौक-७
किराडपुरा-रहेमानिया कॉलनी- ९
बारी कॉलनी परिसर- ८
भवानीनगर- मोंढा- ८
भीमनगर-भावसिंगपुरा-७
आरेफ कॉलनी- ८

Web Title: Water once a week, even if not on time; Citizens of Chhatrapati Sambhajinagars are suffering a lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.