कांद्याने डोळ्यात पाणी
By Admin | Published: May 2, 2016 11:40 PM2016-05-02T23:40:41+5:302016-05-02T23:48:06+5:30
राजेश खराडे ल्ल बीड बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. नोव्हेंबर महिन्यात किलोमागे शंभर रूपयांवर गेलाला कांदा आज ३ रुपये किलोवर आला आहे.
राजेश खराडे ल्ल बीड
बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. नोव्हेंबर महिन्यात किलोमागे शंभर रूपयांवर गेलाला कांदा आज ३ रुपये किलोवर आला आहे. उत्पादनावर झालेला खर्च तर दूरच, पण कांद्याचे शेत खरीपासाठी रिकामे करणेही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात कांद्याने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे.
मराठवाड्यात बीडमध्ये कांद्यांची सर्वाधिक लागवड आहे. येथील कां अहमदनगर, सोलापूर, पुणे या ठिकाणी निर्यात केली होती. कांद्याने काही दिवस शेतकऱ्यांची चंगळ झाली होती. दर कायम राहून भविष्यातही मोठा फायदा होणार या आशेने रबी हंगामात मराठवाड्यात सर्वाधिक लागवड बीड जिल्ह्यात झाली होती.
सरासरी क्षेत्र ३ हजार एवढे असूनही ७ हजार पाचशे हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. काढणीच्या सुरुवातीच्या काळात २० ते २२ रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा झाला होता; मात्र पंधरा दिवसापासून आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कडा येथील कृउबामध्ये बुधवार आणि रविवारच्या बाजारात ५० ते ६० ट्रक कांद्याची आवक होत आहे. येथून दुबईला कांद्याची निर्यात केली जात असून, दर्जात्मक कांद्यालाच मागणी असल्याचे व्यापरी बबलू तांबोळी यांनी सांगितले.
कांद्यांची साठेबाजी : वाहतूक खर्च निघणेही झाले अवघड
कांदा विक्रीतून वाहतूकीचा खर्चही निघत नाही.
भविष्यात दर वाढतील या आशेने व्यापारी कांदा चाळीत तर शेतकरी शेतामध्ये कांद्याची साठवणूक करीत आहेत.
किमान महिनाभर तरी मार्केटची ही अवस्था राहणार असल्याचे कडा येथील बबलू तांबोळी यांनी सांगितले.
कांदा पोसलाच नाही
लागवडीपासून काढणीपर्यंत पाण्याअभावी कांदा पीक धोक्यात होते. योग्य दर मिळले त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. वाढते ऊन व अंतिम टप्प्यात विकतचे पाणी मिळाले नसल्याने कांद्याचा दर्जा शेवटपर्यंत सुधारलाच नाही. परिणाम योग्य दर मिळत नाही. कांद्याच्या योग्यतेनुसार १ रुपयापासून ११ रुपयापर्यंतचे दर मिळत आहेत. रबी हंगाम वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांना कांदा पिकातून मोठा अपेक्षा होती. दर घसरल्याने घोर निराशा झाली आहे.