विमानतळाचा पाणी प्रश्न १२ वर्षांनंतर सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:02 AM2021-06-10T04:02:07+5:302021-06-10T04:02:07+5:30
औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. ...
औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेकडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु मनपाकडून विमानतळाला पाणी मिळालेच नाही. समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे उत्तर मनपाने दिले; पण अखेर विमानतळाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाणी दिले आहे. त्यामुळे विमानतळावरील पाण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे.
विमानतळाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज पडते. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात होती. विमानतळावर होणाऱ्या बैठकीतही हा मुद्दा चर्चीला जात असे. गेल्या १२ वर्षांपासून ही मागणी केली जात होती. विभागीय आयुक्तांनीदेखील पाणी देण्याची सूचना केली होती. तरीही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे विमानतळाला पाणी विकत घ्यावे लागत होते. टँकरवरच भिस्त होती. त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देता येणार नसल्याचे पत्र विमानतळाला देण्यात आले. शेवटी विमानतळ प्राधिकरणाने ‘एमआयडीसी’कडे पाण्याची मागणी केली. अखेर विमानतळासाठी १०० मि.मी. व्यासाच्या पाणीपुरठ्याचे काम ‘एमआयडीसी’कडून करण्यात आले. याद्वारे आता विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होणार आहे.
आज पाणी पूजन
विमानतळाला ‘एमआयडीसी’मार्फत पाणी मिळाले आहे. विमानतळावरील एटीएस कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी सकाळी ११.३० वाजता पाणी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होईल.
- डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ