जायकवाडीत पाणी सोडण्याच्या हालचाली; दूरध्वनी संदेशाद्वारे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 06:01 AM2023-11-25T06:01:47+5:302023-11-25T06:12:06+5:30

शासनस्तरावरून दूरध्वनी संदेशाद्वारे निर्देश

Water release movements in Jayakwadi | जायकवाडीत पाणी सोडण्याच्या हालचाली; दूरध्वनी संदेशाद्वारे निर्देश

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या हालचाली; दूरध्वनी संदेशाद्वारे निर्देश

स. सो. खंडाळकर

छत्रपती संभाजीनगर : ‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जायकवाडीमध्ये पाणी सोडू नका : शासनाची सूचना, अधीक्षक अभियंत्याच्या पत्राने खळबळ’ हे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त शुक्रवारी दिवसभर चर्चेत राहिले. परिणामी, शासनस्तरावरून वरच्या धरणांमधूनपाणी सोडण्याच्या हालचाली वाढल्या व तसे लेखी पत्र जारी करावे लागले. शासनस्तरावरून दूरध्वनी संदेशाद्वारे पाणी सोडण्याचे निर्देश नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी ग्वाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी पत्राद्वारे दिली.

मराठवाडा पाणी जनआंदोलन समितीचे शिष्टमंडळ तिरमनवार यांना भेटले. या शिष्टमंडळाला दिलेल्या पत्रातही तिरमनवार यांनी पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. 

मराठा समाजाने विचारला जाब  
nशुक्रवारी सकाळीच सकल मराठा समाज व  बुलंद छावाच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता स. कों. सब्बीनवार यांना घेराव घालत माफी मागण्याचा आग्रह धरला. त्यांनी माफीनामाही लिहून दिला.   

पाणी अन् आरक्षणाचा काय संबंध? : जरांगे
जालना : पाण्याचा प्रश्न वेगळा असून, तो वेगळ्या पद्धतीने मांडा, मात्र त्यात मराठा आरक्षणाला आणू नका. आंदोलन बदनाम करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना कोणी दिला? पाणी आरक्षणाचा काय संबंध आहे, असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला .

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव आहे. 
-अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री   
 

Web Title: Water release movements in Jayakwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.