दुधना धरणातून सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 11:54 PM2017-08-03T23:54:59+5:302017-08-03T23:54:59+5:30
सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तीन तालुक्यांमधील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या संदर्भात मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन व आ.राहुल पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.
परभणी जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पिके धोक्यात असून या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी निम्न दुधना प्रकल्पात उपलब्ध असलेले पाणी कालव्याद्वारे सोडावे, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत होती. ही मागणी लक्षात घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्यात आला. आ.डॉ.राहुल पाटील, आ.विजय भांबळे यांनी हा प्रश्न उचलून धरला. आ.डॉ.राहुल पाटील यांनी बुधवारी जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. बुधवारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह उच्चपदस्थ अधिकाºयांची बैठक पार पडली. या बैठकीत परभणी जिल्ह्यातील शेतकºयांची अडचण मंत्री महोदयांसमोर मांडण्यात आली. झरी, साडेगाव, वाडी दमई, सावंगी, संबर, मटकºहाळा, धार, धर्मापुरी, टाकळी, मांडवा, नांदापूर, खानापूर, जलालपूर आदी गावांमधील शेतकºयांचा पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन निम्न दुधनाचे पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर जलसंपदामंत्र्यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार गुरुवारी सायंकाळी ५.१० वाजेच्या सुमारास निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून ५० क्युसेस पाणी सोडण्यात आले. दरम्यान, पावसाचा ताण पडल्याने परिस्थिती गंभीर आहे. धरणात ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून शेतकºयांनी सोडलेल्या पाण्याचा लाभ घ्यावा. परंतु, अपव्यय करु नये, असे आवाहन माजलगाव कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांनी केले आहे. दहा दिवस कालव्यांना पाणी राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.