जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदी काठच्या ४३ गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:52 PM2022-07-28T12:52:19+5:302022-07-28T12:53:52+5:30

औरंगाबाद जिल्ह्यात जून व जुलै महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत ७४ मि.मी. पाऊस जास्तीचा झाला आहे.

Water released from Jayakwadi Dam; 43 villages along Godavari River alerted | जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदी काठच्या ४३ गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदी काठच्या ४३ गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

औरंगाबाद :जायकवाडी धरणात सध्या ९१.५७ टक्के पाणीसाठा असून नाशिकहून १९ हजार ८५ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. त्यामुळे पैठण, गंगापूर आणि वैजापुरातील नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रशासनाने केले आहे. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यातील ४३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणात २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ९१.५७ टक्के पाणीसाठा होता. धरणात १९ हजार ८५ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. तर ३० हजार ४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. १० ते २७ क्रमांकाचे दरवाजे दीड फूट उघडले आहेत. २६ ते २७ जुलै सकाळपर्यंत जिल्ह्यात ७.७ मि.मी.पावसाची नोंद झाली. ८ ते २७ जुलै या २० दिवसांत तीन दिवस सूर्यदर्शन झाले. १७ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात शहर व जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे.

माणसे व जनावरे दगावली
यंदाच्या पावसाळ्यात आजवर ९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात ६ जणांचा वीज पडून तर ३ जणांचा पुरात वाहून बळी गेला आहे. त्यांना ४ लाखप्रमाणे प्रती व्यक्ती शासकीय मदत देण्यात आली आहे, तर २२ लहान-मोठी जनावरे दगावली आहेत.

३२ ठिकाणी पडझड
जिल्ह्यातील ३२ ठिकाणी पडझड झाली. यात कच्ची घरे मोठ्या प्रमाणात पडली. पावसामुळे भिंती पडणे, छत काेसळणे आदी घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. बहुतांश घटना ग्रामीण भागात घडल्या आहेत.

सरासरीपेक्षा ७४ मि.मी. जास्तीचा पाऊस
जिल्ह्यात जून व जुलै महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत ७४ मि.मी. पाऊस जास्तीचा झाला आहे. २५७ मि.मी. पर्जन्यमान अपेक्षित होेते, त्या तुलनेत ३३१ मि.मी. पर्जन्यमान झाले आहे. ७४ मि.मी. पाऊस अधिक झाला आहे. अजून पावसाळ्याचे ६४ दिवस जायचे आहेत. येणाऱ्या काळात जास्तीचा पाऊस झाला तर पिकांचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. ५८१ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३३१ मि.मी म्हणजेच ५६ टक्के पाऊस आजवर झाला आहे.

Web Title: Water released from Jayakwadi Dam; 43 villages along Godavari River alerted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.