माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:20 PM2022-07-20T20:20:30+5:302022-07-20T20:23:18+5:30
पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले.
पैठण (औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव प्रकल्पासाठी बुधवारी सकाळी अकरा वाजेस ३०० क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. माजलगाव प्रकल्पासाठी २९९.४२ दलघमी पाण्याचे जायकवाडी धरणात आरक्षण असून याप्रमाणे पाणी सोडण्यात येईल असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाचा जलसाठा ८१% पेक्षा जास्त झाला असून ७५% विश्वासहर्तेच्या प्रचलन आराखड्यानुसार धरणातील जलसाठा ७९.११% पर्यंत कमी करावा लागणार आहे. दरम्यान मंगळवारी पहिल्या टप्प्यात जायकवाडीचा जलविद्युत प्रकल सुरू करून त्याद्वारे गोदावरी पात्रात १५८९ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान जायकवाडी प्रकल्पातील टप्पा दोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आज रोजी धरणाचा जलसाठा फक्त ३८.९७% एवढाच आहे.
जायकवाडी धरणात माजलगावसाठी पाण्याचे आरक्षण असल्याने कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर आदींनी उजव्या कालव्याचे दरवाजे वर करून ३०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला. थेटपर्यंत कालव्याची चाचणी झाल्यानंतर कालव्यातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
जायकवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्गाची शक्यता मावळली... पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले. त्यातच १८८९ क्युसेक्स विसर्ग धरणातून होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून विसर्गाची शक्यता तूर्त मावळली असून धरणात जास्तीत जास्त जलसाठा ठेवण्याचा जायकवाडी प्रशासनाच्या धोरणा नुसार आता जलसाठा ९०% झाल्यानंतर विसर्ग करण्याचा निर्णय होईल असे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.