औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; यंत्रणाच बेलगाम, कोणाचाही वचक नाही, प्रत्येक टँकरमधील पाण्याची विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:45 PM2022-04-12T18:45:33+5:302022-04-12T18:46:03+5:30

मनपाच्या पाण्यावर दररोज हजारो रुपये कमविण्याचा उद्याेग सुरू झाला आहे.

Water robbery in Aurangabad; The system is rampant, no one cares, every tanker sells water! | औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; यंत्रणाच बेलगाम, कोणाचाही वचक नाही, प्रत्येक टँकरमधील पाण्याची विक्री!

औरंगाबादेत पाण्यावर दरोडा; यंत्रणाच बेलगाम, कोणाचाही वचक नाही, प्रत्येक टँकरमधील पाण्याची विक्री!

googlenewsNext

- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : सिडको-हडकोसह जुन्या शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याची प्रचंड ओरड सुरू आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला याच्याशी काहीच देणेघेणे नाही. उलट टँकरच्या माध्यमाने टाक्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी चोरण्यात येत आहे. चोरलेले पाणी कशापद्धतीने विकण्यात येते, हे पाहणे अत्यंत गमतीशीर आहे. मनपाच्या पाण्यावर दररोज हजारो रुपये कमविण्याचा उद्याेग सुरू झाला. विशेष बाब म्हणजे, मनपानेच नियुक्त केलेली टँकर लॉबी एवढी मोठी झाली की, ती मनपाच्या अधिकाऱ्यांचेही ऐकायला तयार नाही.

२०१२ पर्यंत महापालिकेच्या मालकीचे १२ लहान-मोठे टँकर होते. एखाद्या वसाहतीत पाणी आले नाही, तर तेथे मोफत स्वरूपात मनपाचे टँकर नागरिकांना दिले जात होते. नंतर समांतर जलवाहिनीचे काम करणारी युटिलिटी कंपनी आली. मनपाने सर्व टँकर कंपनीला मोफत देऊन टाकले. कंपनीने टँकरची वाट लावली. २०१८ मध्ये टँकर भंगारात विकले. आता मनपाकडे ४ टँकर आहेत. ते झाडांना पाणी टाकण्यासाठी आहेत. मागील १० वर्षांत मनपात टँकर लॉबी सक्रिय झाली. हळूहळू ही लॉबी अधिक बळकट होत गेली. सध्या खासगी कंत्राटदारामार्फत ८० टँकर चालतात. अनेक टँकरच्या फेऱ्याच गायब केल्या जातात. नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याचीही चोरी होते.

- दोन हजार लीटर टँकरला गुंठेवारीतील १५ ते १८ ड्रम असलेल्या नागरिकांच्या ग्रुपला पाणी द्यायचे असते. प्रत्येकी एक ड्रम म्हणजे १०० लीटर होय. १८ ड्रमचे १८०० लीटर पाणी दिले जाते. उर्वरित दोन ड्रमचे पाणी परिसरातच राजरोसपणे विकले जाते.
- १२ हजार लीटरच्या टँकरला ६० ते ८० ड्रमच्या ग्रुपला पाणी द्यायचे असते. ८० ड्रमला ८ हजार लीटर पाणी दिल्यावर ४ हजार लीटर पाणी शिल्लक राहते. हे पाणी मागेल त्याला विकले जाते.
-८० टँकर दिवसभरात किमान ६०० फेऱ्या पूर्ण करतात. एका टँकरमध्ये एका फेरीत २०० लीटर पाण्याची चोरी होत असेल, तर दिवसभरात किती लाख लीटर पाण्याची चोरी होते याचा अंदाज येतो.

अधिकारी, कर्मचारी मुजोर
सोमवारी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख हेमंत कोल्हे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत शहरातील पाणीटंचाईवर चर्चा अपेक्षित होती. मात्र, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या बैठकीकडेच पाठ फिरविली. त्यामुळे या विभागातील काही कर्मचाऱ्यांवर निलंबन अटळ असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Water robbery in Aurangabad; The system is rampant, no one cares, every tanker sells water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.