जायकवाडीतून उपसा घटल्याने शहरावर पाणीटंचाईचे ढग गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 07:20 PM2019-07-09T19:20:32+5:302019-07-09T19:22:57+5:30
तीन दिवसांपासून दररोज १० एमएलडीने पाणी कमी
औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहेत. मागील तीन दिवसांमध्ये शहरात येणारे पाणी तब्बल १० एमएलडीने घटले आहे. शहरात फक्त ९० एमएलडी पाणी येत आहे. एवढ्या तुटपुंज्या पाण्यावर शहरातील लाखो नागरिकांची तहान कशी भागवावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. आज तातडीने धरणात महापालिकेची यंत्रसामुग्री पाठवून मनपाच्या अॅप्रोच चॅनलपर्यंत येणारे पाणी आणखी वाढविण्यासाठी खोदकाम करण्यात आले.
उन्हाळ्यातच जायकवाडीतील पाणी मृतसाठ्यापर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून २४ तास डोळ्यात तेल ओतून पाण्याचा उपसा करावा लागत होता. महापालिकेने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन २०१३ मध्ये धरणात १० कोटी रुपये खर्च करून एक अॅप्रोच चॅनल तयार केला आहे. या चॅनलद्वारे मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत येत होते. मृतसाठाही कमी कमी होत असल्याने मनपाच्या अॅप्रोच चॅनलपर्यंत पाणीच येत नाही. शिवाय मनपाने धरणाच्या आत एक आपत्कालीन पाणीपुरवठा केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या बाजूला ४५० मीटरची विहीरही तयार केली आहे. या विहिरीतही पाणी कमी येत आहे. सहा फ्लोटिंग पंपांद्वारे २४ तास गाळातून पाण्याचा उपसा सुरू आहे. पंप दर दोन ते तीन तासाला बंद पडत आहेत. पंपांत गवत, शेवाळ मोठ्या प्रमाणात येत आहे. मागील तीन दिवसांपासून मनपाला उपसा करण्यासाठी समाधानकारक पाणीच मिळत नाही. मनपाला १२० एमएलडीपेक्षा जास्त पाणी मिळायला तयार नाही.
खोदकाम सुरू
पाणीपुरवठ्याची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता आज मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर सिंचन विभागाची परवानगी मिळवून धरणात चर खोदण्याचे काम सुरू केले. किमान १०० ते १२५ एमएलडी पाणी येथून मिळेल, यादृष्टीने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता बाबूराव घुले, किरण धांडे, बाविस्कर, एस. पी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.
चार दिवसांआड पाणी
पुंडलिकनगर, शिवाजीनगर, एसएफएस पाण्याच्या टाकीवरील वॉर्डांना तीन दिवसांआड पाणी देण्यात येत होते. मनपाने या भागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला . या भागात चार दिवसांआड म्हणजे पाचव्या दिवशी पाणी मिळेल. एन-५, एन-७ येथील दोन जलकुंभावरील २२ वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून तब्बल आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. सिडको-हडको आणि चिकलठाणा भागाला पाचव्या दिवशी पाणी मिळेल.