गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग
By Admin | Published: July 1, 2014 11:13 PM2014-07-01T23:13:42+5:302014-07-02T00:19:00+5:30
गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत.
गेवराई: शहरात अगोदरच मुबलक पाणीपुरवठा होत नाही, त्यातच शहागड बंधाऱ्यातील पाणीसाठाही तळाला गेल्याने गेवराई शहरावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत.
गेवराई शहराला खामगाव परिसरातील गोदावरी नदीवरील शहागड बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या शहरात चार ते पाच दिवसाला पाणीपुरवठा करण्यात येतो. हे पाणीही मुबलक मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गेवराई शहरातील ४५ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा होत असला तरी गेल्या काही दिवसात मुबलक पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे काही नागरिकांसह हॉटेलसह इतर व्यावसायीकांना पाणी विकत घ्यावे लागते. यावर मोठा खर्च होत असल्याचेही नागरिक सांगतात. अशातच शहागड येथील बंधाऱ्यातही अवघे आठ ते दहा दिवस पुरेल येवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे गेवराई शहरातील नागरिकांवर निर्जळीची वेळ येऊ नये, यासाठी पाण्याचे नियोजन व बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी अक्षय पवार, डॉ. शेख इब्राहिम, राजेंद्र मोटे, मुकुंद बाबर यांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष माया सौंदरमल म्हणाल्या, बंधाऱ्यात पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. तर, पालीकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे म्हणाले की, गेवराई शहरात सर्वांना मुबलक पाणी मिळेल याचे नियोजन केले आहे. बंधाऱ्यात पाणी सोडण्याची एक पाळी राहिली असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)