जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

By Admin | Published: November 14, 2015 12:08 AM2015-11-14T00:08:46+5:302015-11-14T00:49:31+5:30

जालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील काही गावे व वाड्या तसेच तांड्यांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

Water scarcity in the district | जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

googlenewsNext


जालना : जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील काही गावे व वाड्या तसेच तांड्यांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. काही प्रकल्प सोडता बहुतांश प्रकल्पांत जेमतेम जलसाठा असल्याने आगामी काळात नियोजन न केल्यास तीव्र पाणीटंचाई होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही गावांमध्ये स्थानिक पातळीवर नियोजन कोलमडत असल्याने ग्रामस्थांना आठ ते पंधरा दिवसाआड पाणी मिळत आहे.
जिल्ह्यात गत काही वर्षांपासून पावसाची सरासरी घटत असल्याने प्रकल्पांत पाणीसाठा नाही. भोकरदन तालुक्यातील जुई, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्पांची पाणी पातळी आज रोजी मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक गावांत पाणीटंचाई असली तरी टँकर अथवा विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव, मांदळा, येवला, सिद्धेश्वपर पिंपळगाव येथे लघू प्रकल्प आहे. तर मंगरूळ, राजाटाकळी व जोगलादेवी येथे उच्च क्षमतेचे केटिवेअर आहेत. तालुक्यातील तीस ते चाळीस गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सर्वच प्रकल्पांतील पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आगामी दिवसांत तालुक्यातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागणार आहे.
केटिवेअर मधील पाणी उपशावर बंदी असून, या बंधाऱ्यात ८० टक्के पाणीसाठा आहे.
जाफराबाद तालुक्यातील काही गावांसोबतच जाफराबादेत आठ ते पंधरा दिवसाआड पाणी येत असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर कोणतेच नियोजन नसल्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. जाफराबाद शहरास खडकपूर्णा मध्यम प्रकल्पांतून पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायतींची विहीर पण
आहे.
अंतर्गत जलवाहिनी जुनाट झाल्याने गावात वारंवार पाणीटंचाई भेडसावते. आजरोजी गावकऱ्यांना आठ ते पंधरा दिवसाआड पाणी मिळते. गावअंतर्गत जलवाहिनी ठिक ठिकाणी फुटलेली आहे. यातून शेकडो लिटर पाणी वाहून जाते.
भारज व चिंचखेडा येथील प्रकल्पांत अत्यल्प पाणी आहे.
परतूर तालुक्यातील निम्नदुधना, नागतास व कसुरा प्रकल्पांत पन्नास टक्के पाणी आहे. इतर प्रकल्पांत जोत्याच्या खाली पाणी पातळी आहे. सद्यस्थितीत तीस पेक्षा अधिक गावात पाणीटंचाईची समस्या तीव्र बनत आहे. टँकरची मागणी नसली तरी डिसेंबर महिन्यात टँकरची संख्या वाढण्याची चिंता आहे. मंठा तालुक्यात काही गावात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत.
बदनापूर तालुक्यातील सोमठाणा प्रकल्प यंदा शंभर टक्के भरल्याने काही गावात पाणीटंचाई नाही. इतर गावांत पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. सोमठाणा प्रकल्प सोडता इतर प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहेत. (प्रतिनिधी)
भोकरदन तालुक्यातील वडशेद गावाचा विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव आला असून, चांदई एक्को व बाणेगावातील प्रकल्पात पाणी कमी आहे. जुई, धामणा प्रकल्पांत चांगले पाणी आहे. डिसेंबरअखेर तालुक्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अंबड तालुक्यातील धनगरपिंपरी, मार्डी, रोहिलागड, गल्हाटी, काटखेडा, डावरगाव, खडकेश्वर, सुखापुरी हे प्रकल्प आहेत. यातील गल्हाटी, सुखापुरी, खडकेश्वर व डावरगाव प्रकल्पात २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. २० पेक्षा अधिक गावात पाणीटंचाई आहे. अंबड शहराला डावरगाव व जायकवाडी योजनेतून पाणीपुरवठा होतो. आठ दिवसांपासून पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.
जालना तालुक्यातील कल्याण मध्यम प्रकल्प वगळता इतर प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याच्या खालीच आहे. टँकर अथवा विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्राप्त झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु बहुतांश गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title: Water scarcity in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.