भाजप, एमआयएममुळेच शहरात पाणीटंचाई,समांतरच्या योजनेचे वाटोळे त्यांनीच केले: चंद्रकांत खैरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 11:40 AM2022-05-18T11:40:51+5:302022-05-18T11:45:01+5:30
समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन
औरंगाबाद : केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना समांतर जलवाहिनी मंजूर केली. मात्र, भाजप आणि एमआयएममुळेच त्या योजनेचे वाटोळे झाले. शहरातील पाणीटंचाईला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हानही त्यांनी दिले. शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारत आहे. हे भाजप आणि एमआयएमला देखवत नाही, शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी वाटेल ते आरोप करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीटंचाईवरून आंदोलन केले होते. मुंबई आणि औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्याचा यांचा डाव आहे. शहरात रस्ते, ड्रेनेज, पथदिव्यांची कामे झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. जलवाहिन्या मुद्दाम चोकअप करणे, जलकुंभांवर आंदोलन करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे सगळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने मोर्चा काढावा का ?
मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने पाणीपुरवठ्यावर मोर्चा काढावा काय, असा सवाल खैरेंनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेला सभेतून उत्तर देण्याची गरज काय होती? विधानसभेत बोलता आले असते. राज्य सरकारने शहराला भरपूर काही दिले आहे. मागच्या सरकारच्या काळात तुकडे - तुकडे करून निधी दिला. मात्र, जाहिराती मोठमोठ्या केल्याची टीकाही खैरे यांनी केली.
कराड, जलील, केणेकर यांच्यावर टीका
खा. इम्तियाज जलील यांना काहीही काम नाही. त्यांनी शहरातील कोणत्या भागात फिरून पाणीटंचाईचा आढावा घेत उपाययोजना केल्या, ते दाखवावे. लोकांच्या काय समस्या आहेत, हे त्यांना माहिती तरी आहे का, असे खैरे म्हणाले. मुस्लिम समाजाचे लोक माझ्याकडे समस्या सोडविण्यासाठी येतात. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मनपात महापौर असताना त्यांनी काय कामे केली, हे मला माहीत आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर ‘टीनपाट’ असून त्यांचे सगळे ‘धंदे’ बाहेर काढण्याचा इशारा खैरे यांनी दिला.