बिडकीन परिसरातील ‘पाणीबाणी’ दूर होणार; १८ कोटींच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 02:09 PM2018-02-17T14:09:14+5:302018-02-17T14:09:57+5:30
डिएमआयसीमुळे बिडकीनचा झपाट्याने विकास होत असून सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
- अनिल गव्हाणे
बिडकीन ( औरंगाबाद ) : डिएमआयसीमुळे बिडकीनचा झपाट्याने विकास होत असून सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. जवळपास १८ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून प्राधिकरणकडून पाणी परिक्षणही करण्यात आले. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या मदतीने लवकरच बिडकीनला मुबलक पाणी मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत जायकवाडी परिसरात एक विहिर तसेच तेथून बिडकीनपर्यंत पाईपलाईन, दोन जलकुंभ, फिल्टर प्लॅन्ट व गावातील वितरण व्यवस्था (पाईपलाईन) अशी कामे करण्यात आली आहेत. सदरील कामाचे परिक्षण व पाणीतपासणी प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता भामरे, उपअभियंता चांदेकर, शाखा अभियंता सरोदे, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज पेरे, या कामांचे ठेकेदार व्ही. आर. महाजन, डॉ. गणेश शिंदे, दिगंबर कोथिंबीरे, वामन साठे, अमोल कोथिंबीरे, कृष्णा काळे यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत केली. विहिरीतून बिडकीन फिल्टर प्लँटपर्यंत पाणी पोहचले असून लवकरच बिडकीनला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी बिडकीनचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामविकास अधिकारी देवीदास ढेपले हे या कामावर लक्ष ठेऊन आहेत. लवकरच या योजनेचा लोकार्पण सोहळा थाटात होणार आहे.
लवकरच लोकार्पण होईल
बिडकीन गावासाठी महत्त्वाचा असलेला पाणीप्रश्न महिनाभरात सुटणार असून जवळपास सर्व कामे झाली आहेत. किरकोळ कामे आटोपताच गावासाठी मुबलक व नियमित पाणीपुरवठा योजनेचे थाटात लोकार्पण करण्यात येईल.
- सारिका मनोज पेरे, सरपंच
पाणीपुरवठा सुरु होणार
जायकवाडी धरण ते गावातील फिल्टर प्लँटपर्यत पाणी आले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनीही पाहणी केली. लवकरच पाणीपुरवठाही सुरु होईल.
- व्ही. आर. महाजन, ठेकेदार
महिनाभरात योजनेने उद्घाटन
महिनाभरात या योजनेने उद्घाटन होणार असून सुरुवातीचे ३ महिने ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ठेकेदार यांच्या निगराणीखाली चालविली जाईल. त्यानंतर ग्रामपंचायतच्या ताब्यात ही योजना दिली जाईल.
-देविदास ढेपले, ग्रामविकास अधिकारी