औरंगाबाद जिल्ह्यातील २६५ गावांना पाणीटंचाईची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:42 AM2018-04-25T00:42:28+5:302018-04-25T00:43:27+5:30
वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वैशाख महिना लागल्यानंतर उन्हाचा पारा चढू लागला आहे. परिणामी, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बिकट होऊ लागला असून, २६५ गावांना पाणीटंचाईची झळ बसते आहे. मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यांत सुरू असून त्यात गंगापूर तालुक्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील ८७ गावांत ८९ टँकरने पाणीपुरवठा होतो आहे. ३०५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले असून, ३२ वाड्या आणि २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारली. कुठेही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी फुलंब्री तालुक्यातील काही गावांना भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.
सर्वाधिक तहानले औरंगाबाद
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ४७२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ३६३ गावांमध्ये हा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा सर्वाधिक तहानला आहे. २६५ गावांत ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागाची राजधानी असलेला औरंगाबाद जिल्हा सध्या पाणीटंचाईच्या झळा सोसत असल्याचे महसूलच्या आकड्यांवरून दिसते आहे. २३ एप्रिलपर्यंतची ही स्थिती असून येत्या महिन्यात यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थलांतरासारखी स्थिती नाही
जिल्ह्यामध्ये अद्याप पाण्यामुळे स्थलांतर करण्याची परिस्थिती उद्भवलेली नाही. विभागातील एकूण जिल्ह्यांपैकी औरंगाबादेत गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे डिसेंबरपासूनच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. पुढील महिनाअखेरीस टँकरचा आकडा ५०० पर्यंत जाईल; परंतु पाण्यामुळे स्थलांतर करावे लागेल, अशी स्थिती नसल्याचा दावा विभागीय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
तालुकानिहाय टँकर्सची स्थिती
तालुका गावे टँकर
औरंगाबाद २५ ३७
फुलंब्री ३७ ५३
पैठण १४ २१
गंगापूर ८७ ८९
वैजापूर ३० ३८
खुलताबाद १९ १८
कन्नड १७ १५
सिल्लोड ३५ ५२
सोयगाव ०१ ०१
एकूण २६५ ३२४