औरंगाबाद जिल्ह्यात पावसाळ्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:27 AM2018-08-08T00:27:26+5:302018-08-08T00:28:25+5:30
आजघडीला जिल्ह्यातील तब्बल तीनशे गावे आणि तेरा वाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्याठिकाणी ३१९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. पिकांनी माना टाकल्या आहेत, तर अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांची पाण्यासाठी मैलोन्मैली भटकंती सुरू आहे. मध्यंतरी टंचाई आराखड्याची मुदत संपल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. दरम्यान, दोन दिवसांच्या खंडानंतर शासनाने टँकर सुरू करण्यास मंजुरी दिली. आजघडीला जिल्ह्यातील तब्बल तीनशे गावे आणि तेरा वाड्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्याठिकाणी ३१९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
वास्तविक उन्हाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनामार्फत पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार केला जातो. ज्या गावात तीव्र पाणीटंचाई आहे, त्या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो; परंतु यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात २९६ गावे व १३ वाड्या आजही तहानलेल्याच आहेत. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला तरीही भूगर्भातील पाणीपातळी वाढलेली नाही.
विहिरी, नदी-नाले, हातपंप, तलाव, कोल्हापुरी बंधारे हे पाण्याचे मुख्य स्रोत मानले जातात. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या योजनाही ग्रामीण भागाला वरदान ठरू शकल्या नाहीत.जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई ही गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद आणि पैठण तालुक्यांना भेडसावत आहे. सध्या जिल्ह्यातील १७८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे, असे असले तरी कन्नड आणि सोयगाव तालुक्यांमध्ये मात्र, फारशी पाणीटंचाई जाणवत नसून त्या दोन्ही तालुक्यांमध्ये एकही टँकर सुरू नाही.
टँकरची तालुकानिहाय स्थिती
औरंगाबाद - ४४
गंगापूर- ७८
कन्नड- ००
खुलताबाद- २७
पैठण- ३९
फुलंब्री - ३२
सिल्लोड - ३४
सोयगाव - ००
वैजापूर - ६६