औरंगाबादेत आधी पाणीटंचाई, आता विजेअभावी उद्योग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:51 PM2018-06-02T23:51:25+5:302018-06-02T23:52:06+5:30
शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहती आधीच पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी (दि.२) महावितरणने उद्योगांना ‘शॉक’ दिला. सकाळी दोन तास वीज गुल झाल्याने झळ बसली. नंतर दुपारी ४ वाजेनंतर पावसाला सुरुवात होत नाही तोच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित झाला. विजेअभावी उद्योग ठप्प झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहती आधीच पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी (दि.२) महावितरणने उद्योगांना ‘शॉक’ दिला. सकाळी दोन तास वीज गुल झाल्याने झळ बसली. नंतर दुपारी ४ वाजेनंतर पावसाला सुरुवात होत नाही तोच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित झाला. विजेअभावी उद्योग ठप्प झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून, २१ मेपासून उद्योजक संघटना एमआयडीसीसोबत बैठका घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहेत.
शेंद्रा आणि चिकलठाण्यातील बहुतांश उद्योगांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली, अशा सगळ्या परिस्थितीत औद्योगिक वसाहतींवर जलसंकट निर्माण झाले असून, पिण्याच्या पाण्यासह प्राथमिक कामकाजासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
एकीकडे उद्योजक पाणीटंचाईला सामोरे जात असताना शनिवारी महावितरणनेही त्यांच्या अडचणीत भर टाकली. चिकलठाणा येथील एक फिडर सकाळी बंद राहिल्याने उद्योजकांचे कामकाज विस्कळीत झाले. जवळपास दोन तास पुरवठा बंद होता. यानंतर दुपारी ४ वाजता त्यात आणखी भर पडली. पावसाला सुरुवात होत नाही तोच संपूर्ण चिकलठाणा एमआयडीसीतील वीजपुरवठा बंद झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५० टक्के उद्योजकांचा पुरवठा सुरळीत झाला नव्हता. शेंद्रा येथील वीजपुरवठा बंद राहिला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे उद्योजकांनी म्हटले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उद्योजकांना पाणीटंचाईने आणि विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
५० ते ७० कोटींचे नुकसान
पुरेसे पाणी मिळत नसल्याने चिकलठाणा, शेंद्रा येथील उद्योजक गेल्या काही दिवसांपासून त्रस्त आहेत. कामगारांना पिण्यासाठी, प्राथमिक कामांसाठीही पुरेसे पाणी नाही. त्यामुळे टँकर मागविण्याची वेळ येत आहे. त्यात शनिवारी वीजपुरवठा खंडित झाला. थोडासा जरी पाऊस आला तरी वीजपुरवठा बंद होतो. हेच शनिवारीही झाले. विजेअभावी ५० ते ७० कोटींचे नुकसान झाले.
-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआ
कमी पाणी नको
उद्योगांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवडाभरापासून हा त्रास होत आहे. सध्या उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम नाही; परंतु औद्योगिक वसाहतींना पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी करता कामा नये. त्यासाठी योग्य यंत्रणा विकसित केली पाहिजे.
-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए
पावसामुळे वीजपुरवठा बंद
चिकलठाणा ‘एमआयडीसी’तील पावसामुळे वीजपुरवठा बंद झाला. दोन तास पुरवठा बंद होता. सकाळी एक फिडर बंद होते. त्यामुळे केवळ तासभर वीज नव्हती.
-संदीप कुलकर्णी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चिकलठाणा, महावितरण