औरंगाबादकरांवर जलसंकट; आता मिळणार सात दिवसांआड पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:18 PM2019-04-06T16:18:06+5:302019-04-06T16:30:14+5:30
एक्स्प्रेस जलवाहिनीकडे मनपा आयुक्त फिरकलेच नाहीत
औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक सध्या पाणी प्रश्नाला जाम कंटाळले आहेत. पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून महापालिकेने दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा तीन दिवसांआड केला. आता तर पालिकेने हद्दच केली आहे. अघोषित नियमानुसार चक्क सात दिवसांआड शहरातील विविध वसाहतींना पाणीपुरवठा होत आहे. एवढ्यावरही महापालिका प्रशासन पाणी प्रश्न गांभीर्याने हाताळण्यास तयार नाही. शहरात येणाऱ्या पाण्यात कशी वाढ होईल, याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सिडको-हडकोतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. त्यांनी जलवाहिनीकडे दिवसभरात ढुंकूनही पाहिले नाही.
मागील एक महिन्यापासून शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एन-५, एन-७ पाण्याच्या टाकीवर दररोज नागरिक आंदोलन करीत आहेत. मनपा मुख्यालयासमोरही विविध वसाहतींमधील नागरिक येऊन आंदोलन करीत आहेत. मनपा प्रशासन कोणत्याच उपाययोजना करण्यास तयार नाही. पूर्वी शहरात दोन दिवसांआड पाणी देण्यात येत होते. पाणी कमी पडू लागले म्हणून मनपाने तीन दिवसांआडचा निर्णय घेतला. यालाही नागरिकांनी मूक संमती दिली. आता महापालिका प्रशासनाने कहरच केला. अघोषितपणे शहरातील बहुतांश वसाहतींना सहा, सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. अनेक नागरिकांकडे आठ दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवण्याची क्षमताच नाही.
वीज वितरण कंपनीचे शटडाऊन
सिडको-हडको भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतानाच शुक्रवारी वीज वितरण कंपनीने तब्बल अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे तब्बल सातव्या दिवशीदेखील पाणी न आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रात्री उशिरा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. सिडको एन-५ भागातील आविष्कार कॉलनीसह इतर ठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठ्याचा वेळ होता. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. मात्र एकाने महापालिकेच्या पाईपलाईनवरच बोअर घेतल्याचा प्रकार समोर आला. या बोअरमुळे पाणी पुढच्या भागाला पोहोचलेच नाही. दरम्यान पाणीपुरवठा बंद करून पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी पाणी येईल, असे नागरिकांना सांगण्यात आले होते. मात्र शुक्रवारी सकाळी ११ ते १.३० असा अडीच तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे या भागाला पाणी मिळू शकले नाही. रात्री उशिरा पाणी दिले जाईल, असे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले.
सिडको-हडकोकडे दुर्लक्ष
शहरातील ४० पेक्षा अधिक वॉर्डांना एन-५, एन-७ येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा होतो. येथे पाणीच कमी येत आहे. त्यामुळे शुक्रवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक महापौरांच्या सूचनेवरून नक्षत्रवाडी ते एन-५ पाण्याच्या टाकीपर्यंत एक्स्प्रेस जलवाहिनीची पाहणी करणार होते. दुपारी एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर आयुक्त आले आणि तिसऱ्या मिनिटाला निघूनही गेले.
कोणत्या भागात पाणी कधी
जयभवानीनगर - सहा दिवसांनंतर
शिवाजीनगर- चार दिवसांनंतर
ब्रिजवाडी- सात दिवसांनंतर
नारेगाव- सात दिवसांनंतर
पॉवरलूम- सात दिवसांनंतर
रवींद्रनगर- चार दिवसांनंतर
मछली खडक- सात दिवसांनंतर
एस. टी. कॉलनी, मुकुंदवाडी- पाच दिवसांनंतर
बेगमपुरा- आठ दिवसांनंतर
गजाननगर-पुंडलिकनगर- चार दिवसांनंतर
आरेफ कॉलनी- सात दिवसांनंतर
साईनगर-एन-६- पाच दिवसांनंतर
गजानन कॉलनी- चार दिवसांनंतर
रामनगर, मुकुंदवाडी- सात दिवसांनंतर