औरंगाबादमधील किराडपुरा, रहेमानिया, अल्तमश भागामध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 07:12 PM2019-04-11T19:12:18+5:302019-04-11T19:15:11+5:30
नवव्या दिवशी पाणी : गोरगरीब, सर्वसामान्यांचे उन्हात हाल, पवित्र रमजान महिन्यात आठवड्यातून दोनदा पाणी द्या
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : रोशनगेट ते आझाद चौक रोडवरील किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी वॉर्डात तब्बल आठव्या आणि नवव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना उन्हात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्यात पाण्यासाठी एवढे हाल होत असतील तर रमजानच्या मे महिन्यात काय होईल, या भीतीने नागरिक हवालदिल झाले आहेत. कधीकाळी नहर-ए-अंबरीच्या माध्यमाने पंचक्रोशीची तहान भागविण्यात येत होती. नहरचे अवशेषच आता नागरिकांनी गायब केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
१६ वॉर्डांचा मुद्दा
शहागंज पाण्याच्या टाकीवर किराडपुरा, रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनीचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या टाकीवर सर्वाधिक १६ वॉर्डांचा पाणीपुरवठा २४ तास सुरू असतो. पूर्वी दोन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. मनपाकडे योग्य नियोजन नसल्याने कधी आठ तर कधी दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. मनपाच्या या कृतीबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. रमजान महिन्यात पाण्याचा नागरिकांना आणखी त्रास होण्याची चिन्हे दिसत आहेत.
किराडपुऱ्यातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त
किराडपुरा वॉर्ड क्र. ४२ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत छोटा आहे. वॉर्डात सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील नहर-ए-अंबरीच्या बंबावरून हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत होते. कालांतराने नहरची ठिकठिकाणी तोडफोड करण्यात आली. नहरीवर टुमदार घरे बांधण्यात आली आहेत. आता नहरचा बंब नावालाच उभा आहे. मनपातर्फे पूर्वी दररोज पाणीपुरवठा करण्यात येत होता. नंतर दोन दिवसांआड केला. तीन दिवसांआडच्या नावावर सध्या आठव्या तर कधी नवव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले. २० बाय ३० च्या घरांमध्ये राहणाऱ्या बहुतांश नागरिकांकडे पाणी साठवून ठेण्यासाठी साधनच नाही. नऊ दिवस पाणी साठवायचे कोठे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. पाणी संपल्यावर आजपासच्या विंधन विहिरींचा आधार घ्यावा लागतो. एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ६ मेपासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. या महिन्यातही पाण्यासाठी आम्हाला भटकंती करावी लागणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरातील बहुतांश वॉर्डांमध्ये आजही चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याच आधारे आम्हालाही पाणी मिळावे, अशी रास्त मागणी नागरिकांची आहे.
वॉर्डातील प्रमुख वसाहती
किराडपुरा, मक्का मशीद परिसर, पाण्याचा बंबा, रोशन मशीद, अकबर बाबाची गल्ली, रोशन फंक्शन हॉल.
लोकसंख्या- ११,०६९
रहेमानिया कॉलनीतही पाण्याचे दुर्भिक्ष
रहेमानिया कॉलनी वॉर्ड क्र. ४१ मध्येही पाण्याचे दुर्भिक्ष असून, या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पाणीटंचाईच्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी महापालिका, लोकप्रतिनिधी पुढाकार घेण्यास तयार नाहीत. या वसाहतीला पूर्वी तीन दिवसांआड पाणी मिळत होते. आता नऊ दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. वॉर्डात काही श्रीमंत मंडळींची घरे आहेत. ९९ टक्के सर्वसामान्य, गोरगरीब येथे राहतात. काही खाजगी विंधन विहिरींना बऱ्यापैकी पाणी आहे. नागरिक एक-दुसऱ्याला पाणी देऊन सहकार्य करतात, हे विशेष. आठ ते नऊ दिवसांत एकदा पाणी येत असल्याने काही मंडळींना त्रास सहन करावा लागतो. किराडपुऱ्यातील पाण्याच्या बंबापर्यंत येणारे पाणी रहेमानिया कॉलनीतून येते. या वॉर्डातही ठिकठिकाणी नहरची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढे नहरपर्यंत पाणीच येणे बंद झाले आहे. पूर्वी रहेमानिया कॉलनीतील नागरिकही किराडपुऱ्यातील पाण्याच्या बंबावरून पाणी आणत असत. नहरीची डागडुजी करून पुन्हा ती सुरू केल्यास १२ महिने पाणी मिळेल असा दावा या वॉर्डातील बुर्जुग मंडळींनी केला. एप्रिल महिन्यात पाणीटंचाई अधिक जाणवत आहे. पुढील मे महिन्यात तरी असे होता कामा नये, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रमजान महिन्यात पाणीटंचाई अजिबात सहन केली जाणार नाही.
वॉर्डातील प्रमुख वसाहती
नेहरूनगरचा काही भाग, यशोधरा कॉलनी, तक्षशिला सोसायटी, रहेमानिया कॉलनी, वैशालीनगर.
लोकसंख्या- ११,३९७
अल्तमशची परिस्थितीही खराब
अल्तमश कॉलनी वॉर्ड क्र . ६१ मध्येही तीव्र पाणीटंचाईला नागरिक सामोरे जात आहेत. आठव्या आणि नवव्या दिवशी पाणी मिळत आहे. किराडपुरा राममंदिरापासून आझाद चौक, जकात नाकामार्गे वॉर्ड परत मंदिराकडे येतो. वॉर्डाचा भौगोलिक परिसर इतर वॉर्डांच्या तुलनेत थोडा मोठा आहे. नागरिकांची संख्याही जास्त आहे. वॉर्डात पूर्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाणी मिळत होते. आझाद चौकापासून हाकेच्या अंतरावरील इतर वॉर्डांना चौथ्या दिवशी पाणी मिळते. मात्र, आम्हालाच आठ ते नऊ दिवसांनंतर पाणी का? असाही प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. महापालिकेचे हे अपयश असल्याचेही उघडपणे नागरिक सांगतात. रमजान महिन्यात हा अन्याय अजिबात सहन केला जाणार नाही. ६ मे नंतर चौथ्या दिवशी पाणी दिले पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वॉर्डातील असंख्य नागरिकांकडे पाणी साठविण्यासाठी जागाच नाही. पाणी संपल्यावर खाजगी टँकर ४०० ते ५०० रुपये खर्च करून मागवावे लागते. पिण्यासाठी २० रुपयांचा जार विकत घेण्याची वेळही नागरिकांवर येत आहे. या गंभीर पाणीटंचाईतून मनपाने योग्य मार्ग काढावा. आठवड्यातून दोनदा पाणी देण्यास मनपाला त्रास काय? असा संतप्त प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहेत. पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा असेही काहींनी नमूद केले.
वॉर्डातील प्रमुख वसाहती
जसवंतपुरा, किराडपुरा काही भाग, रहीमनगर, मध्यवर्ती जकात नाका, मनपा कर्मचारी निवासस्थान, अल्तमश कॉलनी. लोकसंख्या- १०,९७३