पाणीटंचाईचे संकट
By Admin | Published: April 9, 2016 12:35 AM2016-04-09T00:35:42+5:302016-04-09T00:36:56+5:30
नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून तळपत्या उन्हात वाडी, वस्त्यावरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
नांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून तळपत्या उन्हात वाडी, वस्त्यावरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने पाणी टंचाई निवारणार्थ आतापर्यंत १९ कोटी ३८ लाख ८५ हजारांचा निधी खर्च केला आहे. दरम्यान, सध्या २८० टँकरने ग्रामीण भागात पाणीपुरवठा होेत आहे़
दुष्काळाच्या झळांनी ग्रामीण भागातील माणूस होरपळून निघाला आहे़ चैत्राचे उन्हं डोक्यावर घेऊन घोटभर पाण्यासाठी अबालवृद्ध रानोमाळ भटकत आहेत़ जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो माणसे शहराकडे धाव घेत आहेत़ तर काहींनी यापूर्वीच गावे सोडले आहेत़ त्यामुळे गावे ओस पडली आहेत़ गावात वृद्ध माणसेच दृष्टीस पडत आहेत़ पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ एखादया गावात टँकर आले तर त्यावर शेकडो माणसांची पाण्यासाठी झुंबड उडत आहेत़
त्यातून भांडणे, वाद होत आहेत़ टँकर येणार म्हणून रस्त्याच्या कडेला भांडयांची लांबलचक रांग पहाटेपासूनच लागत आहे़ पिण्यासाठी पाणी मिळेल की नाही, अशी चिंता त्यांना पडली आहे़ मुखेड, लोहा, कंधार, नायगाव, देगलूर या तालुक्यात पाणी टंचाई अधिक जाणवत आहे़ जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा पाणीटंचाई निवारण्यासाठी उपाययोजना करण्यात गुंतली आहे़ १ आॅक्टोबर २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या कालावधीत नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची दुरूस्ती करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरीतील गाळ काढणे आदी कामे करण्यात आली असून यासाठी १९ कोटी ३८ लाख ८५ हजार रूपये खर्च झाले आहेत़ ७८७ गावे व १२५ वाड्यातील खाजगी विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या असून यासाठी ५ कोटी ७० लाख १३ हजार रूपये खर्च झाले आहेत़ तर १७४ गावे व १३८ वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १२ कोटी ९१ लाख ४३ हजार रूपये खर्च केले आहेत़ पाणी टंचाई निवारण कार्यक्रमातंर्गत तयार केलेल्या आराखड्यातील आतापर्यंत २५ कोटी ३८ लाख ४५ हजार रूपयांना मंजुरी दिली आहे़
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवकांना त्या - त्या गावात राहण्याचे व तेथील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत़ मात्र काही ग्रामसेवक गावात जाऊन कामे करण्यास अनुत्सूक आहेत़ मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी नुकतेच दोन ग्रामसेवकांना कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून निलंबित केले आहे़ काही ग्रामसेवक आठ - आठ दिवस गावात येत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत़ यापार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे म्हणाले, दुष्काळामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे़ अशा वेळी प्रशासकीय यंत्रणेने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्परता दाखविली पाहिजे़ काही ग्रामसेवकांना या प्रश्नांचे गांभीर्यच राहिले नाही़ गावात पाणी, चारा, मजुरांच्या हाताला काम अशी अनेक कामे प्रलंबित आहेत़
याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी जर वेळीच प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच दुष्काळावर आपण मात करू़ संबधित कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या प्रश्नांकड दुर्लक्ष केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल़ दर आठवड्याला एका गावात जाऊन त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मुक्काम करून तेथील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ (प्रतिनिधी)