छत्रपती संभाजीनगरात पाण्यासाठी बोंब; जायकवाडी धरणातील आपत्कालीन पंप सुरू करणार
By मुजीब देवणीकर | Published: April 18, 2024 12:41 PM2024-04-18T12:41:28+5:302024-04-18T12:43:33+5:30
धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने निर्णय
छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरू झाली आहे. धरणातील पाणीपातळीसुद्धा झपाट्याने घटत चालली असून, मनपाला पाण्याचा उपसा करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागत आहे. धरणाच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आपत्कालीन पंप पुढील पंधरा दिवसांत सुरू केला जाणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
धरणात सध्या १४.५ टक्के इतका पाणीसाठा आहे. दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे महापालिकेचा पाणी उपसा ५ एमएलडीने घटला. पुढील पंधरा दिवसांत पाणीपातळी आणखी कमी होईल. त्यामुळे धरणातील आपत्कालीन पंप सुरू करण्याची तयारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून केली जात आहे.
रामनवमीचा मुहूर्त साधून मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी त्यांच्या नूतनीकरण केलेल्या आणि कार्पोरेट लूक दिलेल्या मनपा मुख्यालयातील दालनाचे फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण होत आहे. पाण्याची मागणी वाढली असली तरी जायकवाडीतून उपसा वाढलेला नाही. नवीन ९०० मिमीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. त्यातून शहराला १८ एमएलडी पाणी मिळत आहे. पाणीपातळी घटल्यामुळे जायकवाडीतून पाण्याचा उपसा ५ एमएलडीने घटला. शहरात १३० ते १३५ एमएलडी पाणी येत आहे. हर्सूल तलावातून ८ एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यातच टँकर भरण्यासाठी ३ एमएलडी पाणी द्यावे लागत असल्याचे प्रशासक यांनी सांगितले.
आपत्कालीन पंपगृह वापरणार
धरणातून पाणी उपसा करताना मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला अनेक अडचणी येत आहेत. धरणात आपत्कालीन पंपगृह बांधलेले आहे. हे पंपगृह उघडे पडल्यामुळे त्यामध्ये पंप बसवून शहराला पाणी पुरवठा करण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे. १५ दिवसांनी आपत्कालीन पंपाद्वारे पाणी उपसा करून शहराला पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे श्रीकांत म्हणाले.