मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट; उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी पाण्याचे सीमोल्लंघन अडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:37 AM2023-10-25T11:37:34+5:302023-10-25T11:39:27+5:30
दोन वर्षांपूर्वीच्या घोषणेची पूर्तता झालीच नाही; अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट
छत्रपती संभाजीनगर : २०२१ साली विजयदशमीच्या मुहूर्तावर मराठवाड्यासाठी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९.२९ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी दिली होती. मात्र, दोन वर्षांनंतरही या पाण्याचे सीमोल्लंघन झाले नाही. शिवाय, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट आले आहे.
मध्य गोदावरी उपखोऱ्यातील १९७५ चा पाणी वापर संरक्षित असल्याने मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नव्हते. मात्र, त्यातील त्रुटी दुरुस्त केल्याने मराठवाड्यासाठी १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध झाले असल्याची घोषणा तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केली होती. १९७५ पूर्वीचा पाणीवापर अबाधित ठेवून तो निर्णय झाल्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने सांगितले होते. या निर्णयामुळे परभणी, नांदेड, बीड, हिंगोली जिल्ह्यांसाठी लाभ होऊन तेथे काही नवीन प्रकल्प बांधणे शक्य होईल, असा दावा महामंडळाने केला होता. मात्र, दोन वर्षांनंतरदेखील या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
वरच्या धरणातील पाण्याचे काय? मराठवाड्यात यंदा १५ टक्के पावसाची तूट आहे. समन्यायी पाणीवाटप सूत्रानुसार जायकवाडीत १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठी असेल, तर अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून उर्वरित पाणी सोडणे आवश्यक आहे. यंदा तर जायकवाडीत केवळ ४७ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे वरच्या धरणातून किमान २० टक्के पाणी सोडणे अपेक्षित आहे; परंतु अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही.
मराठवाड्याची दिशाभूल
निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास, तसेच मध्य गोदावरी उपखोऱ्यातून १९.२९ टीएमसी पाणी उपलब्ध करण्यास दिलेली मंजुरी दिशाभूल करणारी आहे. २०२१ साली शासनाने मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल केली आहे. ते पाणी मराठवाड्याला कसे आणणार, हे कळण्यास मार्ग नाही. दमणगंगेच्या पाण्याविना मराठवाड्याला पर्याय नाही, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले.