जायकवाडी धरण असलेल्या पैठणमध्ये पाणीबाणी; तालुक्यातील २९ गावांत टँकरने पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 07:32 PM2023-10-26T19:32:38+5:302023-10-26T19:33:12+5:30
पाणीटंचाई असलेल्या २९ गावांमध्ये ३१ टँकरच्या ५४ खेपाद्वारे पाणीपुरवठा होत आहे
- संजय जाधव
पैठण: सरासरीच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा सप्टेंबर महिण्या पासूनच पैठण तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सध्या २९ गावात ३१ टँकरने ५४ खेपा करून ५८०७६ ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.आणखी दहा गावांनी टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली असून टँकरने पाणी मागणाऱ्या गावाच्या संख्येत यापुढे वाढ होणार आहे.
जानेवारी महिन्यानंतर तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. यंदा तालुक्यात जेमतेम सरासरी ३३८ मि मी पाऊस झाला. जोरदार पाऊस न झाल्याने नद्या नाल्यांना सुध्दा यंदा पाणी वाहिले नाही. यामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावली असून अनेक गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरींना पाणी कमी पडत आहे.यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.
३१ टँकरने ५४ खेपा
तालुक्यातील पुढील गावात टँकरने पुरवठा करण्यात येत आहे. कंसात खेपाची संख्या. आडूळ - (१ खेप) आडूळ बु (३ खेपा), आंतरवाली खांडी (१), ब्राम्हणगाव तांडा (१), गेवराई मर्दा (१), गेवराई बु (१), गेवराई खु (१), अब्दुल्लापूर व होणबाची वाडी (१), एकतुणी (२), रजापूर (१), थापटी तांडा (१), आडगाव जावळे (१), कडेठाण (१), ब्राम्हणगाव (१), दाभरूळ (१), दरेगाव (१), देवगाव व देवगाव तांडा (१), डोणगाव (१), टेकडी तांडा (१), खादगाव (१), तुपेवाडी (१), तुपेवाडी तांडा (१), चिंचाळा (१), मीरखेडा (१), केकतजळगाव (२), हार्षी (१) व चौंढाळा (१) या प्रमाणे पाणी पुरवठा सुरू असल्याचे विभाग प्रमुख राजेश कांबळे यांनी सांगितले.
खोडेगाव व मुधलवाडी येथे केंद्र
औद्योगिक वसाहतीतील खोडेगाव व मुधलवाडी येथील पाईपलाईनवर टँकर भरण्यासाठी केंद्र तयार करण्यात आले असून तीन खासगी विहीर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत असे प्रभारी गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी सांगितले.
तालुक्यातील जलसाठे निरंक
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण वगळता इतर सर्व जलसाठे निरंक आहेत. यामुळे पैठण तालुक्यात आगामी काळात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. पैठण तालुक्यातील कचनेर, देवगाव, निलजगाव, दावरवाडी, ईनायतपूर, वरवंडी , गेवराई या पाझर तलावातील जलसाठा निरंक आहे.
मध्यम व लघु प्रकल्प: खेर्डा- निरंक, शिवणी - १५%.
गोदावरी वरील मोठे बंधारे: आपेगाव - २०%, हिरडपुरी - १५%
प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून
तालुक्यातील जलस्त्रोताची परिस्थिती लक्षात घेता संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे आदेश पंचायत समिती प्रशासनास दिले आहेत.गावनिहाय परिस्थितीची नोंद आराखड्यात घेण्यात येणार आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे
- सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी, पैठण