शाळांत पाणीटंचाई; विद्यार्थ्यांची गैरसोय
By Admin | Published: February 23, 2016 11:46 PM2016-02-23T23:46:19+5:302016-02-23T23:57:35+5:30
हिंगोली : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी खालावली असून अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत.
हिंगोली : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी खालावली असून अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे शाळेत पाणीटंचाई निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचे पाण्यावाचून गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे मागील काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत आले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या संकटात सापडला असून पाणीपातळी खालावली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यामध्ये जि. प. च्या एकूण ८८० शाळांत १ लाख १३ हजार ७४४ तर इतर शाळांतून १ लाख ३६ हजार ७११ विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. परंतु अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत. त्यात पाणीपातळी खालावल्याने दिवसेंदिवस पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. डिसेंबर महिन्यातच बोअर-हातपंप कोरडे पडल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाययोजना करून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरेल या पद्धतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही, परंतु अनेक शाळामध्ये पाण्याची सुविधा नाही, त्यात हातपंप व बोअरही कोरडे पडल्याने विद्यार्थी घरूनच पाणी पिण्यास आणत आहेत, किंवा जवळपास पाण्याचा शोध घेऊन तहान भागवत असल्याचे सध्या चित्र आहे.
याबाबत सर्व शिक्षा अभियानच्या लेखा विभागाकडे विचारणा केली असता, त्यांनी सर्वच शाळेवर पाण्याची व्यवस्था असल्याचे सांगितले. तसेच हातपंप, विहिरी व नळाची सुविधा आहे. परंतु त्यांना पाणी आहे की, नाही याची माहिती आमच्या विभागाकडे नसते असे सांगून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यामुळे शाळेतील पाणीप्रश्न संबंधित अधिकारी व कर्मचारी किती गांभीर्याने घेत आहेत, हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने निश्चितच पाणीटंचाई शाळेत उद्भवली असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांतच बैठक बोलावून यावर उपाययोजना करण्यात येईल. तसेच संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन शाळेतील पाणीप्रश्न सोडवू, असे त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.