वैजापूर तालुक्यात उन्हाच्या चटक्याअगोदरच पाणीटंचाईच्या झळा असह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:54 PM2018-03-10T23:54:30+5:302018-03-10T23:54:36+5:30
उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.
मोबीन खान
वैजापूर : उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.
तालुक्यातील पंधरा गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनाकडे दाखल केले आहेत. यातील चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारीस्तरावर मंजुरीसाठी आहेत.
सध्या आठ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीपुरवठा करण्यासाठी बारा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात तालुक्यातील लासूरगाव येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले होते. त्यांनतर टँकरच्या मागणीत वाढ होत गेली. नांदूर -मधमेश्वर भागात कॅनलच्या पाण्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर नसली तरी तालुक्याचा उर्वरित डोंगरथडी व शिवना थडी हा भाग कोरडा आहे. या भागातील मन्याडचा अपवाद वगळता सर्व धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने तेथील नागरिकांना उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतावरच तहान भागवावी लागत आहे. मन्याड धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे. पण या धरणातून पाणी उचलण्याची कोणतीही तांत्रिक प्रक्रिया शासनस्तरावर न करण्यात आल्याने या भागातील गावांची अवस्था दरवर्षी टंचाईग्रस्त होते व शासनाला टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. विशेष म्हणजे याबाबत लोकप्रतिनिधीदेखील उदासिन असल्याचे चित्र आहे.
टँकर सुरु असलेली गावे
सद्यस्थितीत लासूरगाव, हडसपिंपळगाव, राहेगाव, सोनवाडी, उंदीरवाडी, पेंडेफळ, बाभूळगाव बु. व बळ्हेगाव या गावांना नऊ टँकरने पाणी पुरवले जात आहे. बाभुळगाव बु., जळगाव, शहाजतपूर, अमानतपूरवाडी यांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहेत. नालेगाव, धोंदलगाव, मालेगाव कन्नड, शिवराई, खिर्डी, हरगोविंदपूर व नारळा या गावांनी टँकरसाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता के.पी.कड यांनी दिली. दरम्यान, येत्या काही दिवसांत उन्हाच्या तीव्रतेमुळे टँकरच्या मागणीत वाढ होऊ शकते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात साठ टँकरद्वारे तालुक्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. बाबतरा येथे दूषित पाण्याचा स्त्रोत असल्याने त्या ठिकाणी जवळपास बारा महिने टँकरने पाणीपुरवठा होत होता. पण येथील टँकर प्रशासनाने आता बंद केले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे पाणी शुद्वीकरणाचा प्लँट बसविण्यात येणार आहे. त्याचा खर्च जवळपास २५ लाख रुपये इतका आहे.