चिंचोली लिंबाजी परिसरात हिवाळ्यातच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:12 AM2018-01-17T00:12:56+5:302018-01-17T00:13:00+5:30

जामडी (ज.)सह अनेक गावांची तहान भागावणारा गणेशपूर लघु प्रकल्प कोरडा पडल्याने ऐन हिवाळ्यात शेलगाव, दिगाव येथे पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.

 Water shortage in the winter of Chincholi Limbo | चिंचोली लिंबाजी परिसरात हिवाळ्यातच पाणीटंचाई

चिंचोली लिंबाजी परिसरात हिवाळ्यातच पाणीटंचाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचोली लिंबाजी : जामडी (ज.)सह अनेक गावांची तहान भागावणारा गणेशपूर लघु प्रकल्प कोरडा पडल्याने ऐन हिवाळ्यात शेलगाव, दिगाव येथे पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठल्याने ६ दिवसांआड, तर कुठे ८ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी थंडीत कुडकुडत ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
दरवर्षी कमी पर्जन्यमान, त्यातच भूगर्भातील सतत खालावणारी पाणीपातळी यामुळे गणेशपूर, जामडी, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी या भागातील विहिरी ऐन हिवाळ्यातच तळ गाठत आहेत. यंदाही वरुणराजाची अवकृपा झाल्याने येथील नदी, नाले, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे कोरडेच राहिले. येथील पाणी प्रश्न गणेशपूर लघु प्रकल्पावर अवलंबून असतो.
मात्र, प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्ण पावसाळ्यात या प्रकल्पाच्या पाणीपातळीत एक इंचही वाढ झाली नाही.
सध्या प्रकल्प कोरडा पडला आहे. यामुळे या प्रकल्पाखालील शेलगाव, दिगाव आदी गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गत सात-आठ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून वणवण भटकंती करावी लागत आहे. शेलगावचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचयात सदस्य विठ्ठल मनगटे म्हणाले की, सध्याची विहिरींची पाणीपरिस्थिती पाहता फेब्रुवारीमध्ये गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ विहीर अधिग्रहित करून पाणीटंचाई दूर करावी.
शेलगाव, दिगाव दोन्ही गावांना विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक पी.आर. दहीहंडे यांनी दिली.

Web Title:  Water shortage in the winter of Chincholi Limbo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.