पाणीस्थिती अद्यापही गंभीर!
By Admin | Published: September 11, 2014 12:41 AM2014-09-11T00:41:49+5:302014-09-11T01:07:45+5:30
औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़
औसा : पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेल्या औसा तालुक्यात मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे़ यंदा तर पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे़ कमी-अधिक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ तीन महिन्यांत केवळ २९८ मि़मी़ इतकाच पाऊस झाला असून आता पावसाळा संपत आला आहे़ परंतु, अद्यापही तालुक्यातील पाण्याची स्थिती गंभीर आहे़ त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे़
खरीप हंगामातील पेरण्यासाठी औसा तालुक्यात यावर्षी वेळेवर पाऊस झाला नाही़ तसेच जो झाला तोही पाऊस तालुक्यात समान नाही़ तब्बल महिनाभर उशिराने पाऊस झाल्यामुळे पेरण्याही उशिरा झाल्या़ तालुक्यात ९८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली़ यात ६० हजार २३८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ यामधील ४० ते ५० शेतकऱ्यांना सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे दुबार पेरण्या कराव्या लागल्या़ तालुक्यात पावसाची स्थिती तशी नाजूकच राहिली आहे़ मागील काही वर्षांपासून सतत कमी होत असलेला पाऊस यावर्षी तर अधिकच कमी झाला आहे़ त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न अजूनही गंभीरच आहे़ पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत़ सध्या तालुक्यातील १० गावे व २ वाडी- तांड्यावर अधिग्रहणातून पाणीपुरवठा सुरू आहे़ आतापर्यंत सप्टेंबरमध्ये अधिग्रहण करण्याची वेळ आली नव्हती़ ती यावर्षी आली आहे़ रिमझिम पावसाने बहुतांश पिकावर रोग पडले आहेत़(वार्ताहर)
तालुक्यात यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत मागील तीन महिन्यात केवळ २९८़४१ मि़मी़ इतकाच पाऊस झाला आहे़ यामध्ये सर्वाधिक पाऊस औसा मंडळात झाला आहे़ सर्वात कमी पाऊस किनीथोट मंडळात झाला आहे़ महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस असा- औसा ३७१ मिमी, लामजना २९४ मिमी, मातोळा २३४, किल्लारी ३४८, भादा २९१, बेलकुंड २६० तर किनीथोट १९१ मिमी इतका पाऊस झाला आहे़ तालुक्याची वार्षिक सरासरी ७८१ मि़मी़ इतकी आहे़ पावसाळ्याचे तीन महिने संपून गेले़ पण पावसाने मात्र अजूनही वार्षिक सरासरीची पन्नाशी गाठलेली नाही़ त्यामुळे धरणे, नद्या, नाले, विहिरी, बोअर अजूनही कोरडे आहेत़ आगामी काळात जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर यावर्षी दिवाळीनंतर लगेचच पाणीटंचाई सुरु होणार आहे़
कमी पावसामुळे सध्या सबंध तालुक्यातील पाणी साठ्यांची स्थिती चिंताजनक आहे़ मोठा पाऊस झाला तरच विहिरी, तलाव भरतील आणि पाण्याचा प्रश्न सुकर होईल, असे तहसीलदार दत्ता भारस्कर व गटविकास अधिकारी अनंत कुंभार यांनी सांगितले़