जायकवाडी धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; कोणत्याही क्षणी गोदावरी पात्रात विसर्ग होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:27 AM2024-09-03T11:27:36+5:302024-09-03T11:28:13+5:30
गोदावरी नदी पात्रात विसर्ग होणार असल्याने प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा ९० टक्के झाला असून, कोणत्याही क्षणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांतील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडी धरणाची पाणीपातळी एका महिन्यातच १३ वरून ९० टक्क्यांवर आली आहे. धरणात सध्या १६ हजार १८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणीपातळी ९५ टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीतील निर्णयानंतर गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.
दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता जायकवाडी धरणास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचे नियोजन करा. नागरिकांना सतर्कतेचा इशारा द्यावा, तसेच सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जि.प. सीईओ विकास मीना, अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, चेअरमन विलास भुमरे आदींची उपस्थिती होती.