उद्योगाच्या वाहिनीतून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:06 AM2018-01-17T00:06:35+5:302018-01-17T00:06:44+5:30
समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.
शहराची लोकसंख्या १५ ते १६ लाखांपर्यंत गेली आहे. महापालिकेकडे ११० ते १२० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. दररोज शहराची मागणी २०० एमएलडी पाण्याची आहे. मागील काही वर्षांपासून महापालिका विविध वसाहतींमध्ये तीन दिवसाआड, पाच दिवसाआड पाणी देत आहे. उन्हाळा सुरू होताच पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. त्याची चाहूल महापालिकेला आतापासूनच लागली आहे. समांतर जलवाहिनीचा निर्णय लागेपर्यंत डीएमआयसीने पैठण ते शेंद्रा अशी नवीन जलवाहिनी टाकली आहे. नक्षत्रवाडी किंवा फारोळा येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारून हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. डीएमआयसीने पैठण, कचनेर मार्गे शेंद्रापर्यंत ५५ कि.मी.ची जलवाहिनी उभारली आहे. जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सध्या शेंद्रा एमआयडीसीला दररोज ९० ते ९५ एमएलडी या जलवाहिनीतून पाणी मिळणार आहे. सध्या एमआयडीसीला या पाण्याची गरज नाही. जेव्हा या भागात शंभर टक्के उद्योग सुरू होतील तेव्हाच पाण्याची गरज भासणार आहे. तेव्हापर्यंत हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याचा अंदाज घेण्यात येईल, असेही मुगळीकर यांनी नमूद केले.
उद्योगमंत्र्यांची मदत घेणार
शहरातील पाणीप्रश्न सुटावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून डीएमआयसीचे पाणी शहराला वापरता येऊ शकते का याचा विचार करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. शहरातील ४० टक्के वसाहतींना आजही महापालिका पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.