औरंगाबादमध्ये अर्ध्या तासात पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 09:09 PM2017-09-19T21:09:57+5:302017-09-19T21:10:20+5:30
अर्धा तास पडलेल्या पावसामुळे अर्ध्या शहरात पाणीच पाणी झाले. पुंडलिकनगर, न्यायनगर, जयभवानीनगर, हुसैन कॉलनी, दूध डेअरी चौक या भागांतील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचून दुकानांमध्ये पाणी शिरले.
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरावर असणारी पावसाची कृपा मंगळवारीदेखील कायम राहिली. दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे अर्ध्या शहरात पाणीच पाणी झाले. पुंडलिकनगर, न्यायनगर, जयभवानीनगर, हुसैन कॉलनी, दूध डेअरी चौक या भागांतील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचून दुकानांमध्ये पाणी शिरले.
चिकलठाणा विमानतळावरील नोंदीप्रमाणे या अर्ध्या तासात ७ मि.मी. पाऊस पडला; मात्र मुख्य शहरामध्ये पावसाचे प्रमाण यापेक्षा खूप अधिक असण्याची शक्यता आहे. नाल्या तुंबलेल्या असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागला. ऐन दुपारीच पावसाने झोडपल्याने लोकांची चांगलीच गैरसोय झाली. पावसाचा जोर एवढा होता की, लोकांना आसरा शोधण्यापूर्वीच भिजावे लागले.
यंदाच्या पावसाने मनपाच्या ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ची पुरती वाट लावली आहे. भूमिगत गटारे व नाल्यांची सफाई आणि योग्य निगा न राखल्यामुळे रस्त्यांवर पाणी जमा होत आहे. घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे. आतापर्यंत औरंगाबाद तालुक्यात ५१६.०५ मि.मी. पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने रविवारी मराठवाड्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.