औरंगाबाद महापालिकेकडून वर्षभरात अवघे ५० दिवसच झाला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:09 AM2019-05-14T01:09:57+5:302019-05-14T01:13:10+5:30

महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.

Water supply from Aurangabad Municipal Corporation only 50 days a year | औरंगाबाद महापालिकेकडून वर्षभरात अवघे ५० दिवसच झाला पाणीपुरवठा

औरंगाबाद महापालिकेकडून वर्षभरात अवघे ५० दिवसच झाला पाणीपुरवठा

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेकडून बहुतांश नागरिकांना वर्षातून फक्त ५० दिवसच पाणी मिळत आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या पाण्याच्या तुलनेत पाणीपट्टीचे दर खूपच आहेत. तब्बल साडेचार हजार रुपये पाणीपट्टीचे दर राज्यात कुठेच नाहीत.
पाणी टंचाईला कंटाळलेल्या औरंगाबादकरांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांचा चांगलाच घाम फोडला. त्यामुळे पाणीपट्टीचे दर किमान ३ हजार रुपयांपर्यंत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. येणाºया सर्वसाधारण सभेत मनपा प्रशासनाकडून दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

केंद्र, राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी महापालिकेला समांतर जलवाहिनीसाठी निधी दिला. या निधीवर व्याजच १२५ कोटी रुपये जमा झाले आहे. मात्र आजपर्यंत महापालिकेला समांतर जलवाहिनी टाकता आली नाही. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक प्रभागांना आठव्या दिवशी पाणी देण्यात येत आहे. पाण्यासाठी मागील दोन महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने एन-५, एन-७ येथील जलकुंभावर झाले आहेत. शहराच्या आसपास असलेल्या तब्बल २०० वसाहतींना आजपर्यंत महापालिकेने जलवाहिनी टाकून दिलेली नाही. आजही या वसाहती टँकरवर दिवस काढत आहेत. मनपाकडे आगावू पैसे भरूनही टँकरद्वारे वेळेवर पाणी मिळत नाही. एकीकडे पाण्यासाठी शहरात प्रचंड ओरड सुरू असताना जायकवाडी जलाशयातील पाणी पातळीही खालावली आहे. मृतसाठ्यातून सध्या शहराची तहान भागवावी लागत आहे. शहरात येणाºया पाण्यात किमान २० टक्के घट झाली आहे.

पाणी प्रश्नावर लोकसभा निवडणूक कशीबशी पार पडली. विधानसभा निवडणुकीत मतदारराजा सोडणार नाही, असे सत्ताधाºयांना वाटू लागले आहे. पुढील वर्षी ऐन उन्हाळ्यातच मनपाची निवडणूक आहे. त्यामुळे सहा महिन्यांत समांतरचे नारळ फोडण्यासाठी युती सरसावली आहे. पाणीपट्टीचे दर कमी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचेही पाणीपट्टी कमी करण्यावर एकमत झाले आहे.


पत्नीने वाढविले होते दर
२०१२मध्ये विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले यांनी १८०० रुपयांवरून पाणीपट्टीचे दर २५०० रुपये केले होते. त्यानंतर समांतर जलवाहिनीसाठी दरवर्षी १० टक्के दरवाढीचा निर्णयही अनिता घोडेले यांच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. सात वर्षांनंतर पुन्हा पाणीपट्टीचे दर कमी करण्याचे दायित्व अनिता घोडेले यांचे पती नंदकुमार घोडेले यांच्यावर येऊन ठेपले आहे.

येणाºया सर्वसाधारण सभेत दर आणखी कमी करण्यासाठी चर्चा होईल. नगरसेवक ठरवतील तेवढे दर ठेवण्यात येतील. साधारणपणे ३ हजार रुपयांच्या आसपास दर राहतील, असे वाटत आहे.
- नंदकुमार घोडेले, महापौर

Web Title: Water supply from Aurangabad Municipal Corporation only 50 days a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.