पाणीपुरवठ्याचे रेकॉर्ड कंत्राटदाराच्या हवाली
By Admin | Published: August 26, 2014 02:20 AM2014-08-26T02:20:01+5:302014-08-27T00:13:48+5:30
औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. १ सप्टेंबरपासून ती कंपनी शहरातील पाणीपुरवठा आणि देखभालीचे काम करणार आहे. १ लाख १० हजार घरगुती नळांची नोंद मनपा दप्तरी आहे.
नळधारकांच्या यादीत हस्तांतरणानंतर मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या बड्या नळधारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे त्यांच्याकडील थकबाकी मनपा घेणार की कंपनी घेणार, याबाबत पालिकेने आजवर कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान होण्याचे संकेत आहेत. शिवाय पालिकेचा करसंकलन विभाग पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा मागील अनेक वर्षांपासून दाखवीत नाही. पुढे अफाट मागे सपाट अशा पद्धतीने आजवर वसुली करण्यात आली आहे.
पाणीपट्टीतून मिळाले ५ कोटी
१ एप्रिल २०१४ ते २१ आॅगस्ट २०१४ पर्यंत पाणीपट्टीतून ५ कोटी १ लाख २१ हजार रुपये मनपाने वसूल केले आहेत. गतवर्षी पाणीपट्टीतून २२ कोटी ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. नळधारकांच्या आकडेवारीचा विचार केला, तर ३१ मार्च २०१४ पर्यंत २ हजार ७५० रुपयांप्रमाणे ३० कोटी २५ लाख रुपये वसुली होणे गरजेचे होते. ८ कोटी रुपये अजून मनपाचे नळधारकांकडे बाकी आहेत. ही रक्कम कोण वसूल करणार असा प्रश्न आहे. यावर्षी ३३ कोटी ५५ लाख रुपयांची पाणीपट्टी घरगुती नळधारकांकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यातील ५ कोटी मनपाने वसूल केले आहेत. उर्वरित २८ कोटींतून ४० टक्के रक्कम कंत्राटदार वसूल करून मनपाला देणार असल्याचे करारात नमूद आहे. असा दावा मनपा करते आहे.