वाळूज उद्योगनगरीत पाणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 05:10 PM2018-11-03T17:10:07+5:302018-11-03T17:10:33+5:30
वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.
वाळूज महानगर: जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने शुक्रवारपासून पाणी पुरवठा बंद केल्यामुळे उद्योगनगरीत दोन दिवसांपासून पाणीबाणी सुरु आहे. परिणामी उद्योजकांना विकतच्या पाण्यावर भागवावे लागत आहे.
वाळूज औद्योगिकनगरीत पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण येथील जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येतो. या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीतर्फे ब्रह्मगव्हाण ते वाळूज या मार्गावर जलवाहिनी टाकलेली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून अचानक वाळूज औद्योगिकनगरीतील पाणी पुरवठा बंद केला.त्यामुळे उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाने कडे पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार, अशी विचारणा केली. मात्र, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु असून काम पूर्ण होताच पाणी पुरवठा सुरु केला जाईल, अशी उत्तरे उद्योजकांना देण्यात आली.
औद्योगिकनगरीतील बहुताश उद्योजकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करुन ठेवलेली आहे. त्यामुळे शुक्रवारी साठवून ठेवलेले पाणी उपयोगात आणले. मात्र दुसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा सुरु न झाल्यामुळे उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता दिवाळी सण तोंडावर आला असून वर्क आॅर्डर पुर्ण करण्याचे काम उद्योगनगरीत जोमाने सुरु आहे.
मात्र, ऐन सणासुदीच्या काळात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कारखान्यातील उत्पादनावर परिणाम होत असल्याची ओरड उद्योजकांतून सुरु आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योजकांना कुठलीही पूर्वसुचना न देता पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप उद्योजक अनिल पाटील, राहुल मोगले, डॉ.शिवाजी कान्हेरे, अब्दुल शेख, अर्जुन आदमाने, दिंगबर मुळे आदी उद्योजकांनी केला आहे. कारखान्यात पाणीच नसल्यामुळे काही कारखान्यातील कामगारांना शनिवारी दुपारनंतर सुट्टी दिल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.
कारखान्यात टँकर व जारचे पाणी
शनिवारीही पाणी पुरवठा पूर्ववत न झाल्याने सकाळी कंपनीत आलेल्या कामगार व अधिकाºयांची गैरसोय झाली. शुक्रवारी साठवून ठेवलेला जलसाठाही संपला. त्यामुळे अनेक उद्योजकांनी पदरमोड करुन कामगारांना पिण्यासाठी जारचे पाणी मागविले होते. काही कंपन्यांत उद्योजकांनी टँकर मागवून इतर गरजा पूर्ण केल्या.
महावितरणकडून शुक्रवारी शटडाऊन असल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु केले होते. मात्र, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर वाळूज एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणी पुरवठा बंद केला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून, लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- दिलीप परळीकर, सहायक अभियंता,एमआयडीसी, औरंगाबाद
----------------------------------------