पावसाळ्यातही पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:19 AM2017-08-14T00:19:05+5:302017-08-14T00:19:05+5:30

खुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे.

Water supply to five villages during the monsoon tanker water supply | पावसाळ्यातही पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

पावसाळ्यातही पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद तालुक्यात भर पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाऊस गायब झाल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील पाच गावांना टँकरने तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करून प्रशासनाने शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाऊस नसल्याने पिके करपली आहेत. सर्वच जण पावसासाठी देवाला साकडे घालत आहे. तालुक्यात आतापर्यंत फक्त २२.६० टक्केच पाऊस पडला आहे.
खुलताबाद तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला होता. त्यानंतर पाऊस जो गायब झाला तो परत आलाच नाही. मध्यंतरी रिमझिम पावसाने पिके कशीबशी तग धरून उभी होती. परंतु गेल्या २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने पिके करपू लागली आहेत. जमिनीतील पाणीसाठा खोलवर गेल्याने गावागावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे टँकर सुरू करावे, म्हणून ग्रामपंचायतीने तालुका पंचायत समिती कार्यालयास पाणीटंचाईचे प्रस्तावही दाखल केले; परंतु ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या युक्तीप्रमाणे कागदी घोडे मिरविण्याचे काम सुरू आहे. पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तालुका प्रशासनाने शुक्रवारपासून गदाना, बोरवाडी, भडजी, ममनापूर, विरमगाव या पाच गावांना शासकीय पाण्याचे टँकर सुरू केले आहेत तर टाकळी राजेराय गावास ३ विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर बोरडमई , पळसगाव, लामणगाव, सराई येथे विहिर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील खिर्डी, मावसाळा गावातही पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामपंचायत सोमवारी टँकरसाठी पंचायत समिती कार्यालयास प्रस्ताव दाखल करणार आहे. अशीच काही परिस्थिती तालुक्यातील इतर गावात निर्माण झाली असल्याने मुसळधार पाऊस न पडल्यास भरपावसाळ्यात टँकरची संख्या आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
तालुक्यात १३ आॅगस्टअखेर फक्त १७८ मि.मी. इतकाच म्हणजे २२.६० टक्केच पाऊस झाला असून तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ७९९.५० इतकी असून गेल्यावर्षी आतापर्यंत ४०३ मि.मी पाऊस झाला होता. पंरतु यंदा पावसाने उघडीप दिल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: वाया जाणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण दिसू लागले आहे.

Web Title: Water supply to five villages during the monsoon tanker water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.