पाणीपुरवठा हळूहळू पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:59 AM2017-10-11T00:59:23+5:302017-10-11T00:59:23+5:30
मागील दोन दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक वसाहतीला किमान पिण्यापुरते तरी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी आणि शनिवारी ३६ तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे शहरात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांमध्ये शहरातील प्रत्येक वसाहतीला किमान पिण्यापुरते तरी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रविवारी आणि सोमवारी ज्या वसाहतींना पाणी मिळाले नव्हते त्यांना चक्क मंगळवारी पाणी देण्यात आले. दिवसभरात पाणी आले नसल्याची एकही तक्रार नगरसेवक, नागरिकांनी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली नाही.
दिवाळीत पाणीपुरवठा सुरळीत राहावा या दृष्टीने महापालिकेने ३६ तासांचा शटडाऊन घेतला होता. खंडण काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिन्यांची गळती थांबविण्याचे काम केले. याच काळात फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्यात आला. शहरातील विविध व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली. शनिवारी मध्यरात्रीपासून शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. मागील तीन दिवसांमध्ये शहरातील १५ लाख नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिका तारेवरची कसरत करीत आहे. ३६ तासांच्या खंडण काळामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सोमवारी आणि मंगळवारी शहरातील बहुतांश वसाहतींना पाणी देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली. सोमवारी रोटेशननुसार अनेक वसाहतींना पाणी देणे मनपाला शक्य झाले नव्हते. मंगळवारी दिवसभर कमी-जास्त प्रमाणात पाणी देण्यात आले. जाधववाडी, सुरेवाडी, मयूरपार्क, नंदनवन कॉलनी आदी वसाहतींना पाणी दिले. पाणीपुरवठ्याचे एक चक्र पूर्ण होईपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येणार नसल्याचे चहल म्हणाले. मंगळवारी एकाही नगरसेवकाने पाणी आले नाही, अशी तक्रार केली नाही, असा दावाही त्यांनी केला.