मराठवाड्यामध्ये पाणीसाठा जेमतेमच; अनेक धरणे कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:55 PM2018-08-18T23:55:11+5:302018-08-19T06:45:36+5:30

नांदेडमध्ये स्थिती तुलनेने चांगली, विष्णुपुरीसह ४ प्रकल्प भरले

Water supply in Marathwada; Many dams dry | मराठवाड्यामध्ये पाणीसाठा जेमतेमच; अनेक धरणे कोरडी

मराठवाड्यामध्ये पाणीसाठा जेमतेमच; अनेक धरणे कोरडी

googlenewsNext

औरंगाबाद : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सलग दोन दिवस मराठवाड्यात भीज पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी, लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमधील साठा जेमतेमच असल्याचे पाणी टंचाईचे ढग कायम आहेत. तुलनेने अपवाद केवळ नांदेड जिल्ह्याचा आहे. या जिल्ह्यात ४० टक्के साठा झाला असून विष्णूपुरीसह ४ मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत.

दोन दिवसांच्या पावसानंतर जायकवाडीत अडीच टक्के पाणी वाढले आहे. धरणात २९.५५ टक्के साठा झाला आहे. लातूर जिल्ह्यात आठ पैकी तीन मध्यम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा जोत्याखाली आहे़ लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात केवळ ४़८० टक्के साठा आहे़ बीड जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. १६ मध्यम प्रकल्पांपैकी केवळ एका प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. १२६ लघुप्रकल्पांपैकी एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त साठा आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील २१९ पैकी २० प्रकल्प कोरडेठाक असून, तब्बल ११७ प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली आहे़ परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या येलदरी प्रकल्पात केवळ २ टक्केच पाणी आहे. नांदेड जिल्ह्याची स्थिती तुलनेने
चांगली आहे.

जिल्ह्यात एकूण ३०० दलघमी म्हणजे ४० टक्के जलसाठा झाला आहे. नांदेडमधील विष्णूपूरीसह किनवट तालुक्यातील लोणी, डोंगरगाव व नागझरी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरणात ४२ टक्के जलसाठा झाला असून २६ लघुप्रकल्पांपैकी १० तुडुंब भरले आहेत. जालना जिल्ह्यात सहा मध्यम आणि ५७ लघु प्रकल्प असून दोन दिवसांच्या पावसाने त्यात जेमतेम वाढ झाली आहे.

नागपूर विभागात अल्प जलसाठा
नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहेत. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.१३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा ४६.८९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन धरणे रिकामी आहेत. इतरही धरणात अल्प जलसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ५० टक्के भरले आहे. अमरावतीमधील ऊर्ध्व वर्धा धरणात ४६.२४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ७८.८१, तर बेंबळा धरणात ५२.७२ टक्केच जलसाठा आहे.

अहमदनगरमध्ये सरासरी ५५ टक्के पाऊस
गुरूवारी दिवसभर पडलेल्या पावसाने सरासरीत एकदम १० टक्के भर पडून ती ५५ टक्के झाली आहे. बारा महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली. पावसाने खरीप बाजरी, भूईमूग, कांदा, तूर, मूग, मका, कपाशी पिकांना जीवदान मिळणार आहे.

खान्देशात कडधान्याचे उत्पादन घटणार
खान्देशात दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना फायदा झाला असला तरी कडधान्याला २० ते ३० टक्के फटका बसण्याची शक्यता आहे. जल प्रकल्पात थोडी वाढ झाली आहे. पावसाने जळगाव जिल्ह्याची सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली.
धुळे जिल्ह्यात मका, ज्वारी व बाजरी करपली आहे. वेळेवर पाणी न मिळाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पावसाचा कपाशी व तूर पिकाला जास्त फायदा होईल. साक्री तालुक्यातील तिन्ही मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले. ‘अक्कलपाडा’सह अनेर, बुराईच्या साठ्यात वाढ होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात पाणीसाठा वाढला आहे. पिकांनाही जिवदान मिळाले आहे. जिल्ह्यातील ३६ लघु प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांमध्ये थेंबभरही पाणी नाही तर दहा प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

Web Title: Water supply in Marathwada; Many dams dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.